‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 06:15 IST2025-12-22T06:14:52+5:302025-12-22T06:15:33+5:30
Maharashtra Local Body Election Results News in Marathi: BJP ठरला सर्वात मोठा पक्ष; शिंदेसेना दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर; काँग्रेसने बूज राखली

‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालात सत्ताधारी महायुतीने विरोधी महाविकास आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडवला. रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपणच नंबर वन असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यापाठोपाठ शिंदेसेनेनेही दमदार कामगिरी करत विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाची पुनरावृत्ती केली आहे. अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र शरद पवार गट आणि उद्धवसेनेची कामगिरी या निवडणुकीत अत्यंत निराशाजनक ठरली आहे. संपूर्ण निकालात त्यांचा कुठेही फारसा प्रभाव दिसला नाही.
या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. त्या जोरावर भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपची ही राज्यातील आतापर्यंतच्या नगरपरिषद निवडणुकीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
शिंदेसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतला. कोकणात शिंदेसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित पवार यांनीही आक्रमकपणे प्रचार केला, परिणामी त्यांनाही चांगले यश मिळाले.
मविआकडून कोणतेही बडे नेते आक्रमकपणे प्रचारात उतरलेले दिसले नाहीत. त्याचे प्रतिबिंब या निकालातून दिसून आले. काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात चांगली कामगिरी केली. उद्धवसेनेने सर्व जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टाकली. परिणामी पक्षाची कामगिरी निराशाजनक झाल्याचे दिसून आले.
निकालात खास काय?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला ४८% हून अधिक जागा मिळणे असे कधी झालेले नाही.
३३०० हून अधिक नगरसेवक हे एकट्या भाजपचे निवडून आले.
इतर पक्ष केवळ नगराध्यक्षपदी निवडून आले पण त्यांच्या जागा पुरेशा निवडून आलेले नाहीत. काँग्रेस ११०२ वरून १३१वर आली आहे.
नगराध्यक्ष आणि नगरसेवक अशा दोन्ही ठिकाणी प्रचंड जागा जिंकणारा भाजप हा पक्ष ठरला आहे.
शिवसेना ५१ जागी नगराध्यक्षपदी आली असली तरी भाजपापेक्षा त्यांच्या जागा ५ पटीने कमी आहेत.
तर राष्ट्रवादी ३ पटीने खाली आली आहे.
नगराध्यक्षपदाचा विचार केला तर एकजूट शिवसेना आणि एकजूट राष्ट्रवादी असताना जितक्या जागा या दोन पक्षांना गेल्यावेळी मिळाल्या त्यापेक्षा अधिक जागा आता मिळाल्या आहेत.
महापालिकेतील विजय याहून मोठा असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. हे यश टीम भाजपचे आहे. शिवाय, या प्रचारात मी ना विरोधकांवर टीका न करता केलेले काम आणि पुढचे व्हिजन मांडले. त्यामुळे हा विजय जनतेने विकासाला दिलेला सकारात्मक कौल आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याहून मोठे यश भाजप व महायुतीला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नगरसेवकांचा विचार केल्यास भाजपने नवा विक्रमच केला आहे. २०१७ मध्येही आम्ही नंबर एक होतो. तेव्हा आमचे १ हजार ६०१ नगरसेवक विजयी झाले होता. आता ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. हे प्रचंड मोठे जनसमर्थन असून विधानसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली आहे, असे ते म्हणाले.
सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर करण्यात आला. बोगस मतदार, दडपशाही, सत्तेचा गैरवापर व पैशांचा प्रचंड वापर पाहायला मिळाला. सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वांत महत्त्वाची ठरली.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
या निवडणूक निकालांचे आकडेही विधानसभेसारखेच आहेत. त्याच मशीन, तीच सेटिंग आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. या निवडणुकीत पैशांची गारपीट झाली.
- संजय राऊत, खासदार, उद्धवसेना