नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:33 IST2026-01-15T13:33:00+5:302026-01-15T13:33:33+5:30
मतदारयादीतील घोळ आणि बोटावरील शाई पुसली जात असल्याचा आरोप.

नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते? पगार कशासाठी घेतात? उद्धव ठाकरे संतापले...
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीतील त्रुटी, दुबार नावे आणि बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी विरोधकांकडून केल्या जात आहेत. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.
नऊ वर्षे निवडणूक आयुक्त काय करत होते?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली. दुबार मतदार, बोटावरील शाई पुसणे या प्रकारावर त्यांनी संताप व्यक्त केला. मुंबई महापालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असताना, या काळात निवडणूक आयुक्त, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग नेमके काय करत होते? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच, निवडणूक आयुक्त हे पगार कशासाठी घेतात, याचा खुलासा व्हायलाच हवा, असेही ते म्हणाले.
मतदारयादीतील गोंधळ कायम
ठाकरे पुढे म्हणाले, सकाळपासून मुंबईसह राज्यातील विविध शहरांतून मतदारयादीतील गोंधळाबाबत तक्रारी येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मतदारांची नावे वगळली जात आहेत, दुबार मतदारांचा प्रश्न सुटलेला नाही, बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हा गोंधळ अजूनही संपलेला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. तसेच, निवडणूक आयुक्तांनी रोज केलेले काम जाहीर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज ठाकरे यांचाही निवडणूक आयोगावर हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, आधी दुबार मतदारांशी आमचा संबंध नाही असे सांगितले, नंतर मुंबईत १० लाख दुबार मतदार असल्याचे मान्य केले, व्हीपॅट वापरणार नाही असे सांगण्यात आले, आता मतमोजणीसाठी ‘पाडू’ नावाचे नवीन यंत्र वापरले जाणार असल्याचे समोर आले आहे. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही, तसेच निवडणूक आयोगाने त्याबाबत स्पष्टताही दिलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
शाईऐवजी मार्कर पेनवर प्रश्नचिन्ह
राज ठाकरे यांनी बोटावर शाईऐवजी मार्कर पेन वापरण्यावरही टीका केली. सॅनिटायझर लावल्यावर मार्करची खूण पुसली जाते. मग मतदान करा, शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा, हाच काय विकास? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.