Latest Marathi News LIVE Updates: माझ्यावरील आरोप काल्पनिक, पुरावे द्या; नीलम गोऱ्हेंनी फेटाळले तृप्ती देसाईंचे आरोप

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:02 IST2026-03-30T11:47:50+5:302026-03-30T18:02:30+5:30

इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि दुसरीकडे लष्करी कारवाईची तयारी, यातील सत्य काय?, इस्रायल-इराणमध्ये समझौता ...

Maharashtra Marathi News Live Updates 30 March 2026: US Israel Iran War News, Strait of Hormuz, Ashok Kharat Crime Inquiry, PM Narendra Modi, Election, CM Devendra Fadnavis, IPL 2026, LPG Shortage, Fuel Prices | Latest Marathi News LIVE Updates: माझ्यावरील आरोप काल्पनिक, पुरावे द्या; नीलम गोऱ्हेंनी फेटाळले तृप्ती देसाईंचे आरोप

Latest Marathi News LIVE Updates: माझ्यावरील आरोप काल्पनिक, पुरावे द्या; नीलम गोऱ्हेंनी फेटाळले तृप्ती देसाईंचे आरोप

इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि दुसरीकडे लष्करी कारवाईची तयारी, यातील सत्य काय?, इस्रायल-इराणमध्ये समझौता कसा होणार?, भारतीय जहाजांना होर्मुझचा मार्ग खुला झाल्यानं LPG संकटातून मिळालेला दिलासा, लॉकडाऊनच्या चर्चांना मिळालेला पूर्णविराम, अशोक खरात प्रकरणी समोर येणारे नवे धागेदोरे आणि आयपीएलचे वारे या आणि अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

30 Mar, 26 : 09:32 PM

जालन्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू; अंबड तालुक्यातील महाकाळा हादरले

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा येथे अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोविंद प्रल्हाद लहाने, वय २१ आणि आदित्य दगडू बेद्रे, वय २० अशी मृतांची नावे आहेत.
 

30 Mar, 26 : 06:12 PM

पाकिस्तानी बनावटीच्या साहित्याची विक्री उघड; तीन आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेत पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी प्रॉडक्ट्सची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि तातडीने कारवाईची मागणी केली.

30 Mar, 26 : 06:00 PM

मी भोंदूबाबाला भेटलेच नाही, माझ्यावरील आरोप काल्पनिक - नीलम गोऱ्हे

मी आणि माझं कुटुंब आम्ही कधीच भोंदूबाबाकडे गेलो नाही. माझ्यावरील आरोप कपोलकल्पित आहे. माझ्या कामाची पद्धत पारदर्शक आहे. या प्रकरणात सरकारने एसआयटी केली आहे. या प्रकरणातील पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी नक्कीच त्यांना तपास यंत्रणेकडे घेऊन गेली आहे. अधिवेशन सुरू असताना मी यात बोलले नाही. ज्यांना आरोप लावायचे त्यांनी लावावे. मी भोंदूबाबाकडे गेले असेल तर पुरावा द्या असं सांगत नीलम गोऱ्हे यांनी तृप्ती देसाई यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.  

30 Mar, 26 : 05:15 PM

अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या आई स्वर्णलता  यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर वयोमानाशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते.

30 Mar, 26 : 05:13 PM

दोन जहाजांनी पार केली होर्मुझ, भारताची १८ जहाजे अजूनही पर्शियाच्या आखातातच

 

भारताची १८ तेल-गॅस जहाजे अजूनही होर्मुझ सामुद्रधुनीच्या पलिकडे म्हणजे पर्शियन आखातच उभी आहेत. या जहाजांवर ४८५ कर्मचारी-अधिकारी असून, ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जल वाहतूक मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार यांनी दिली. 

दोन जहाजे ९४००० मेट्रिक टन एलपीजी घेऊन येत आहे. या दोन्ही जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तेल आणि ऊर्जा पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सध्या देशातील सर्व बंदरावरील काम अव्याहतपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. 

30 Mar, 26 : 04:02 PM

पश्चिम आशियात संघर्ष वाढला! हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलचे १२ सैनिक जखमी

पश्चिम आशियातील संघर्षाला तूर्तास विराम मिळण्याची चिन्हे नाहीत. इस्रायलने पुन्हा एकदा लेबनानची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहे. इस्रायलच्या आयडीएफने याबद्दलची माहिती दिली आहे. 

इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, इराणचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या अड्ड्यांवर लक्ष्य केले आहेत. लेबनानमधील माध्यमांनीही हल्ले सुरू असल्याचे वृत्त दिले आहेत. 

दरम्यान, इस्रायलच्या आयडीएफने म्हटले आहे की, "लेबनानमधील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामध्ये १२ इस्रायली जवान जखमी झाले आहेत. दक्षिण लेबनानमध्ये एका मिसाईल हल्ल्यात दोन सैनिक गंभीर जखमी झाले.  तर एका ड्रोन हल्ल्यातही काही जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ऑपरेशन सुरू असताना झालेल्या एका अपघातात काही जवान जखमी झाले आहेत.   

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या झळा इतर देशांनाही बसल्या आहेत. लेबनानमध्ये युद्धामुळे १० लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. 

30 Mar, 26 : 03:00 PM

पुण्यातील बाणेर, औंध, पाषाण परिसरात जोरदार पाऊस

30 Mar, 26 : 02:53 PM

बावनकुळे यांचे वडेट्टीवारांना खुले आव्हान

माध्यमांसमोर वक्तव्य करून काही होणार नाही. जर खरोखर चौकशी हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांकडे किंवा संबंधित यंत्रणेकडे पुरावे द्यावेत, महसूल विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना खुले आव्हान देत ठोस पुरावे सादर करण्याचे आवाहन केले.
 

30 Mar, 26 : 02:52 PM

‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कांदळवन उद्यान’

मुंबईतील पहिले कांदळवन उद्यान  बोरिवली पश्चिम गोराई जेट्टी जवळ साकार होत आहे. मौजे बोरिवली (गोराई) नगर भूमापन क्रमांक ८८३ येथे गोराई जेट्टीजवळ हे उद्यान विकसित करण्यात असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. या उद्यानाला ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी कांदळवन उद्यान’ असे नाव देण्याची स्थानिक भाजप आ. संजय उपाध्याय यांची मागणी शासनाने मंजूर केली आहे.

30 Mar, 26 : 01:52 PM

नवी मुंबई महानगर पालिकेचा ६७०४ कोटी ४३ लाखांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा  २०२६ - २७ साठी ६७०४  कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प विशेष महासभेत स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सादर केला. शहरवासीयांवर कोणतीही करवाढ केली जाणार नाही. महानगर पालिका कर्जरोख्यातून ४०० कोटी उभारणार असून १०० कोटी रूपये कर्ज घेणार आहे. वाचा सविस्तर

30 Mar, 26 : 12:06 PM

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोनला अटक

दिल्लीच्या सीमेवरून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी शब्बीर अहमद लोन बांगलादेशात बसून पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'एसआय'च्या (ISI) इशाऱ्यावर लष्करचं एक नवीन मॉड्यूल तयार करत होता. वाचा सविस्तर

30 Mar, 26 : 12:01 PM

खरातची चौकशी सुरू आहे, योग्य वेळी माहिती देऊः मुख्यमंत्री

अशोक खरात प्रकरणातील तपासावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल. सविस्तर वृत्तासाठी क्लिक करा.... 

30 Mar, 26 : 11:59 AM

इराणसाठी चिमुकल्यांचं मोठं मन

 लडाखमधील लेहपासून ते जम्मू-काश्मीरमधील चंदरकोट आणि बडगामपर्यंत, लोक युद्धग्रस्त इराणसाठी सढळ हाताने मदत करत आहेत. लेहमधून मानवतेचं दर्शन घडवणारी अशीच एक घटना समोर आली आहे. लेहमध्ये लोक पैसे, मौल्यवान धातू, दागिने आणि जीवनावश्यक वस्तू दान करत आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लहान मुलीने आपली पिगी बँक फोडून त्यात जमा केलेले पैसे मदतकार्यासाठी दिले आहेत. इतकंच नाही तर अनेक मुलांनी आपल्या सायकली सुद्धा दान केल्या आहेत. वाचा सविस्तर

30 Mar, 26 : 11:59 AM

अवकाळी पावसाचा तडाखा, काढणीला आलेला कांदा झाला भुईसपाट

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांदा पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी कांद्याची पिके पूर्णपणे भुईसपाट झाली आहेत. वादळी वाऱ्यामुळे कांद्याची उभी पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

30 Mar, 26 : 11:59 AM

खरात प्रकरणात एसआयटीची पारदर्शक चौकशी; दोषींना सूट नाही – गिरीश महाजन

खरात प्रकरणात एसआयटीकडून अतिशय पारदर्शकपणे चौकशी सुरू आहे. एसआयटीकडून चाकणकर यांना समन्स दिले असतील, तर त्याचे उत्तर त्या देतील. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला सोडले जाणार नाही. चौकशीचा भाग म्हणून एसआयटीने चाकणकर यांना बोलावले असावे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

30 Mar, 26 : 11:58 AM

सोलापूर एमआयडीसीला मोठा दिलासा; 14 कोटींची सूट जाहीर

-सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वपूर्ण निर्णय.

-एमआयडीसीतील उद्योजकांना ‘क्रिटिकल इन्फ्रा स्कीम’मधून विशेष बाब म्हणून 14 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे.

-भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

30 Mar, 26 : 11:58 AM

“कराडच्या तासवडे MIDC मध्ये भीषण स्फोट; केमिकल कंपनीला आग, परिसर हादरला!”

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर येत आहे. तासवडे MIDC परिसरातील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. सलग झालेल्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. तासवडे MIDC मधील एका केमिकल कंपनीत अचानक भीषण स्फोट झाला. यानंतर एकामागून एक असे तीन ते चार स्फोट झाले, ज्यामुळे तब्बल दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरल्याची माहिती समोर येत आहे.

30 Mar, 26 : 11:57 AM

नांदेड मनपाच्या नव्या वाहनांचे पूजन; अविरत कक्षाचे उद्घाटन

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने नव्या वाहनांचे पूजन आणि अविरत कक्षाचे उद्घाटन आज पार पडले. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. महानगरपालिका परिसरात आयोजित या कार्यक्रमात स्वच्छता आणि मलनिस्सारण विभागासाठी नवीन वाहनांचा समावेश करण्यात आला. यामध्ये रस्ते स्वच्छतेसाठी स्वीपिंग मशीन तसेच मलनिस्सारण विभागासाठी जेटिंग, गलफर आणि पुनर्वापर यंत्रणा असलेली वाहने समाविष्ट आहेत.

30 Mar, 26 : 11:57 AM

म्हाडा कॉलनीत नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे अस्वलांचा वाढता वावर; अनुचित घटनेची भीती

अजिंठा पर्वतरांगेला लागून असलेल्या बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उरलेले अन्न उघड्यावर टाकण्याच्या प्रकारामुळे अस्वलांचा वावर वाढला असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून दररोज तब्बल तीन अस्वल या परिसरात येत आहेत.

30 Mar, 26 : 11:56 AM

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना ट्रकची धडक; थोडक्यात बचावले

भंडारा–गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा आज सकाळी नागपूरजवळ अपघात झाला. भंडाऱ्यावरून नागपूरकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने या अपघातात ते थोडक्यात बचावले असून त्यांची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना होत होते. नागपूरजवळ हल्दीराम परिसरात हा अपघात घडला. विशेष म्हणजे, याच मार्गावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

30 Mar, 26 : 11:56 AM

बीडमध्ये कोट्यवधींची वृक्षलागवड वाया? पाण्याअभावी झाडे सुकल्याचा आरोप

बीड जिल्ह्यातील वृक्षलागवड मोहिमेवरून प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 30 March 2026: US Israel Iran War News, Strait of Hormuz, Ashok Kharat Crime Inquiry, PM Narendra Modi, Election, CM Devendra Fadnavis, IPL 2026, LPG Shortage, Fuel Prices