Latest Marathi News LIVE Updates: इटलीने नेपाळला १० विकेट्सने हरवलं; टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 19:03 IST2026-02-12T08:29:30+5:302026-02-12T19:03:03+5:30
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: भारत - अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ...

Latest Marathi News LIVE Updates: इटलीने नेपाळला १० विकेट्सने हरवलं; टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ
Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: भारत - अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. सपशेल शरणागती पत्करून सरकारने देश विकण्याची टीका त्यांनी केली आहे. त्याला सरकारच्या वतीने कोण आणि काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांना, चौकशीपर्यंत थांबण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मात्र, या विषयाला हळूहळू राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने त्याच्या जागी कोण, हा प्रश्न आहे. टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे.
LIVE
12 Feb, 26 : 08:06 PM
पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; नितेश राणेंनी घेतला आढावा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या प्रस्तावित पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग येणार आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे दूर करून तो तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना सक्रिय होण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
12 Feb, 26 : 07:02 PM
बारमध्ये बारबालांचा अश्लील नाच; स्थानिक पोलिसांना पत्ताच नाही!
मीरारोडच्या एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारबालांचा अश्लील नाच आणि मंजुरीपेक्षा जास्त संख्येने बारबाला असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांना होते, मात्र स्थानिक पोलिसांना त्याचा थांगपत्ता नसतो, असे पुन्हा उघडकीस आले आहे. मीरारोडच्या एका बारमधून तब्बल १९ बारबाला सापडल्या असून छाप्या नंतर बारच्या १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 Feb, 26 : 06:25 PM
इटलीने नेपाळला १० विकेट्सने हरवलं; टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ
इटली संघाने नेपाळविरूद्धच्या सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १२३ धावा केल्या होत्या. इटलीच्या सलामीवीरांनीच १२.४ षटकांत १२४ धावा केल्या आणि विजय मिळवला. इटलीने पहिल्या विजयासह २ गुण मिळवले. तर नेपाळला दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. यामुळे टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे.
12 Feb, 26 : 06:04 PM
दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन
दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वाचा सविस्तर
दूरदर्शन परिवार की ओर से श्रीमती सरला माहेश्वरी को भावपूर्ण श्रद्धांजलि। वह दूरदर्शन की सम्मानित और प्रतिष्ठित समाचार वाचिका थीं, जिन्होंने अपनी सौम्य आवाज़, सटीक उच्चारण और गरिमापूर्ण प्रस्तुति से भारतीय समाचार जगत में विशेष स्थान बनाया। उनकी सादगी, संयम और व्यक्तित्व ने दर्शकों… pic.twitter.com/Hx8glZI7rk
— Doordarshan National दूरदर्शन नेशनल (@DDNational) February 12, 2026
12 Feb, 26 : 04:16 PM
भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय! ३.२५ लाख कोटींची झाली डील
भारताने फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) सुरुवातीच्या प्रस्तावाला मान्यता दिली, याची किंमत अंदाजे ३.२५ लाख कोटी आहे. हा करार दसॉल्ट एव्हिएशनसोबत होईल.
12 Feb, 26 : 03:41 PM
जालन्यात ठिंबक कंपनीला भीषण आग; 4 गाड्यांनी शमवली ज्वाला
जालन्यात ठिंबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली. एमआयडीसी फेज थ्रीमध्ये ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कंपनीला लागलेली आग इतकी भीषण होती की आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर सुमारे 80 लिटर रसायनांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली.
12 Feb, 26 : 03:28 PM
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूककोंडी, २ ते ३ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा
मुंबई- नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर २ ते ३ किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. उड्डालपुलाच्या अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
12 Feb, 26 : 03:08 PM
छत्रपती संभाजीनगर पोलिस भरतीत २८% उमेदवार पदवीधर
छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरतीस बुधवारी प्रारंभ झाला असून भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित तरुणांचा मोठा सहभाग दिसून आला आहे. पात्र ठरलेल्या ४,३४१ उमेदवारांपैकी १,२२१ (२८ टक्के) उमेदवार बीई, बीटेक, एमबीए, बी.फार्मसी, एलएलबी, एमएस्सी आदी पदवीधारक आहेत.
12 Feb, 26 : 02:59 PM
नवी मुंबईत भ्रष्टाचार प्रकरणी श्वेतपत्रिका; गणेश नाईकांचा इशारा
प्रशासकीय काळात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचा पुनरुच्चार आज वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. तब्बल सहा वर्षांनंतर महानगरपालिकेवर नगरसेवक निवडून आले असून भाजपाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत.
12 Feb, 26 : 02:52 PM
२५ वेळा संधी दिली पण अवहेलना झाली, दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं
२५ वेळा संधी दिली पण अवहेलना झाली, दिल्ली हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं
12 Feb, 26 : 02:12 PM
भारत खरेदी करणार ११४ राफेल आणि ६ P8I एअरक्राफ, मोठ्या करारावर शिक्कामोर्तब
हवाई दलाकडे असलेला राफेल विमानांचा ताफा वाढवण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्याबरोबरच अमेरिकेकडून ६ P8I टेहळणी विमानं खरेदी करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
12 Feb, 26 : 02:01 PM
राहुल गांधींपेक्षा मोठी दुसरी खोटारडी व्यक्ती या देशात नाही, गिरिराज सिंह यांची बोचरी टीका
राहुल गांधींपेक्षा मोठी दुसरी खोटारडी व्यक्ती या देशात नाही, त्यांना देशात यादवी पेटवायची आहे, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची बोचरी टीका
#WATCH | Delhi | Union Minister Giriraj Singh says,"There is no bigger liar than Rahul Gandhi in the country...He wants to start civil war in the country...He lies in the temple of truth. Under PM Modi, farmers can never face injustice. When the Agriculture Minister and Commerce… pic.twitter.com/RlwB1hxyBS
— ANI (@ANI) February 12, 2026
12 Feb, 26 : 01:53 PM
अजितदादांच्या जाण्याबाबत शांत राहण नैतिकतेला शोभेल का?- अमोल मिटकरी
काही जण म्हणताहेत दे सोडून हा विषय पण मला प्रश्न इतकाच पडतोय ज्यांनी या पुरोगामी महाराष्ट्रासाठी व शिव शाहु फुले आंबेडकर विचारधारेसाठी आयुष्यभर लढा दिला,ज्या नेत्याने कधी जातीवर मत मागितली नाहीत त्यांच्या जाण्याबाबत शांत राहण नैतिकतेला शोभेल का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला.
12 Feb, 26 : 01:25 PM
विलिनीकरणाबद्दल बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये; सुप्रिया सुळेंनी विलिनीकरणाबद्दल काय सांगितलं?
दिल्लीत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. पण, अनेकवेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, माझं पोट किती मोठं आहे. आणि आज माझा भाऊच नाही राहिला हो. त्यामुळे काय कुणाबद्दल काय काढावं. भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं, ते दादाच्या (अजित पवार) आणि माझ्यामध्ये आहे. ते वास्तव आहे", असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.
विलिनीकरणासंदर्भात एक बैठक सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही झाली होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, सुनील तटकरेंनी अशा कोणत्याही बैठकीला मी नव्हतो, असे या चर्चांवर बोलताना म्हटले आहे.
12 Feb, 26 : 01:21 PM
अजितदादा पक्षात एकटे पडलेले आम्हाला दिसत होते- रोहित पवारांचा आरोप
अजित पवार हे त्यांच्याच पक्षात एकटे पडल्यासारखे दिसत होते. त्यांच्या पक्षातील काही आमदार दबक्या आवाजात अजित पवारांच्या बाजुने बोलत होते. पण पक्षातील काही पदाधिकारी मात्र याविरोधात होते. त्यामुळे दादा एकटे पडल्यासारखेच चित्र होते, असे रोहित पवार म्हणाले.
12 Feb, 26 : 01:21 PM
तुमच्याबद्दल सहानुभूती, पण कायदा आपलं काम करेल"; राजपाल यादववर कोर्टाची भूमिका
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवच्या जामीन अर्जावर बोलताना स्पष्ट केले की, न्यायालयाला त्याच्याबद्दल सहानुभूती असली तरी कायदा आपले काम चोख करेल. दुसऱ्यांदा आदेश दिल्यानंतरच ते शरण आले, याकडे न्यायालयाने विशेष लक्ष वेधले. दरम्यान, राजपालच्या वकिलांनी त्याच्या मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जामिनाची मागणी केली होती.
12 Feb, 26 : 01:00 PM
श्रीलंकेची द्विशतकी धमाका, नेपाळला २२६ धावांचे आव्हान
कुसल मेंडिस, पवन रत्ननायके, दसुन शनाका तिघांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत २२५ धावा ठोकल्या. नेपाळकडून जितेंनकुमारने सर्वाधिक २ बळी घेतले.
225/5. A new Pallekele record! 📈🏏
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 12, 2026
Clinical performance by our batters to set a massive target against Oman. Time for the bowlers to take over! 🇱🇰💪#SLvOMA#SriLankaCricket#LionsRoarpic.twitter.com/OgtUbUN43M
12 Feb, 26 : 12:33 PM
"आधी कामगार, आता शेतकरी; मोदी सरकारकडून जनतेची लूट"; प्रियांका गांधींचे टीकास्त्र
"नरेंद्र मोदी सरकारने आधी लेबर कोड आणून कामगारांच्या अधिकारांवर गदा आणली, आणि आता अमेरिकेच्या दबावाखाली येऊन शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड केली आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारात ज्या अटी ठेवण्यात आल्या आहेत, त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल. याआधीही सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे आणले होते, ज्यामध्ये ७५० शेतकऱ्यांचा बळी गेला. मोदी सरकार जनतेसाठी नाही, तर जनतेच्या विरोधात काम करत आहे. त्यांच्या या जनविरोधी धोरणांविरुद्ध काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे. आम्ही आमच्या कामगार आणि शेतकरी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही," असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
नरेंद्र मोदी सरकार ने पहले लेबर कोड लाकर मजदूरों के अधिकारों पर हमला किया, फिर अमेरिका के दबाव में किसानों के हितों से समझौता कर लिया। अमेरिकी ट्रेड डील में जिस तरह की शर्तें रखी गई हैं, उससे भारतीय किसानों की कमर टूट जाएगी।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 12, 2026
इसके पहले भी ये सरकार किसानों के खिलाफ कानून ला चुकी… pic.twitter.com/0ZxGAOng10
12 Feb, 26 : 12:27 PM
"हक्कभंग प्रस्ताव हा केवळ लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न"; प्रियंका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. "हा हक्कभंग प्रस्ताव केवळ लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आणला जात आहे. खरा हक्कभंग तर मंत्रिमंडळातील अशा काही मंत्र्यांनी केला आहे, ज्यांनी अमेरिकेसमोर आपल्या देशाची प्रतिमा डागाळली आहे आणि देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास तोडला आहे," असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
VIDEO | Delhi: Shiv Sena (UBT) MP Priyanka Chaturvedi (@priyankac19) on Union Minister Kiren Rijiju's remark that the government will move a privilege motion against Lok Sabha Leader of Opposition Rahul Gandhi says, "This privilege motion is only a distraction. The real breach of… pic.twitter.com/hDwBUVS5hg
— Press Trust of India (@PTI_News) February 12, 2026
12 Feb, 26 : 11:43 AM
अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शालेय सहलीची बस उलटली
संगमनेर ( जि. अहिल्यानगर): नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सहलीच्या बसचा गुरुवारी (दि.१२) सकाळी ८ वाजता भीषण अपघात झाला. अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी गावाच्या हद्दीत (एमएच १४ एलएक्स ६७४७) या बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
12 Feb, 26 : 11:37 AM
अजितदादा गेले हे अजूनही खरं वाटत नाही, रोहितची अवस्थता साहजिक- सुप्रिया सुळे
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दादा गेले हे आजही खरं वाटत नाही. रोहित पवारांची अस्वस्थता साहजिक आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की पारदर्शक पद्धतीने चौकशी होईल. आपण चौकशीची वाट बघूया.
12 Feb, 26 : 11:30 AM
: शहापूरमध्ये नवोदय विद्यालयाला हिरवा कंदील; सिंचन विभागाकडून बिनशर्त जागा मंजूर
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, निवासी व सर्वांगीण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहापूर तालुक्यात नवोदय विद्यालय उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आ. ॲड. निरंजन डावखरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत जलसंपदा (तापी, विदर्भ व कोकण विभाग) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित प्रस्तावास अंतिम मंजुरी दिली आहे.
12 Feb, 26 : 11:28 AM
एका डोळ्यात आनंद अन् एका डोळयात अश्रू अशी परिस्थिती- सुप्रिया सुळे
आमच्या सुनेत्रा वहिनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्या याचा मला आनंद आहे. तर दुसरीकडे आमचा अजितदादा आमच्यात नाही याचे दु:ख आहे. त्यामुळे एका डोळ्यात आनंद अन् एका डोळयात अश्रू अशी परिस्थिती झाली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
12 Feb, 26 : 11:12 AM
Rolls-Royce च्या CEO नं पंतप्रधान मोदींची घेतली भेट
ब्रिटनची लक्झरी कार निर्माता कंपनी रोल्स-रॉयसचे सीईओ तुफान एर्गिनबिलजिक यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारतात आपला व्यवसाय वाढवण्याबाबत आणि 'विकसित भारत' अभियानाचा भाग होण्याबाबत सविस्तर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.
ब्रिटनची लक्झरी कार निर्माता कंपनी रोल्स-रॉयसचे सीईओ तुफान एर्गिनबिलजिक यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पाहा काय आहे कंपनीचा प्लॅन.#rollsroyce#PMNarendraModi#indiahttps://t.co/y9DvXob2NH
— Lokmat (@lokmat) February 12, 2026
12 Feb, 26 : 10:57 AM
परभणीमध्ये उद्धवसेनेचे सय्यद इक्बाल होणार महापौर, तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या गणेश देशमुख यांचं नाव निश्चित
परभणी महानगपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र आली असून, उद्धवसेनेचे सय्यद इक्बाल यांचं नाव महापौरपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या गणेश देशमुख यांचं नाव निश्चित झालं आहे.
12 Feb, 26 : 10:50 AM
मुंबई पालिकेत मोदी-मोदी घोषणा देण्याचा संबंध काय? संजय राऊतांचा खरमरीत सवाल
मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचं काम शिवसेनेने केलं. मुंबई महापालिकेत मोदी-मोदी घोषणा देण्याचा संबंध काय? मोदी-मोदी घोषणा म्हणजे अदानी-अदानी घोषणेसारखे आहे. जसे राहुल गांधी म्हणाले की भारत माता विकायला काढली आहे. तसेच या लोकांनी मुंबई विकायला काढली आहे, अशी रोखठोक टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
12 Feb, 26 : 10:43 AM
बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केलं मतदान
बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत असून, बांगलादेशमधील काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Bangladesh Elections | Chief Adviser of the interim government of Bangladesh, Muhammad Yunus, casts his vote for the 13th Parliamentary elections, at a polling centre in Dhaka.
— ANI (@ANI) February 12, 2026
(Source: Chief Adviser Press Wing) pic.twitter.com/i4AnQV0rdE
12 Feb, 26 : 09:37 AM
मंगेश साबळे पुन्हा ॲक्टिव्ह; वीजप्रश्नी आक्रमक होताच प्रशासनाची धावपळ
वेगवेगळ्या आंदोलनामुळे प्रसिद्ध असलेल्या मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या उमेदवाराने पराभव केला. या पराभवातून बाहेर पडत साबळे यांनी दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने आणि ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगेश साबळे यांनी आज अनोखे आंदोलन केले. महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर थेट 'गोधडी' घेऊन ठिय्या मांडत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. (अधिक वाचा)
12 Feb, 26 : 09:18 AM
राघव चड्ढा यांनी संसदेत उल्लेख केलेला "राइट टू रिकॉल" काय आहे?
आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा यांनी बुधवारी "राईट टू रिकॉल" चा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यामुळे या कायद्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेच्या इच्छेनुसार कामगिरी न केल्यास त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडून आलेल्या नेत्यांना काढून टाकण्याचा अधिकार असावा. "मतदारांना मतदानाचा अधिकार आहे तसाच त्यांना कामगिरी न केल्यास प्रतिनिधींना परत काढून टाकण्याचा अधिकारही असला पाहिजे, असा मुद्दा चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला. (अधिक वाचा)
12 Feb, 26 : 09:05 AM
कट रचून लीक केलं गेलं माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं पुस्तक, तपासाचे धागेदोरे पोहोचले परदेशात
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, नरवणे यांचं हे पुस्तक लीक करण्यामागे व्यापक कटकारस्थान असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अनिवार्य परवानगीशिवाय नियोजनबद्धरीत्या हे पुस्तक लीक करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक तपासामधून समोर आल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.
12 Feb, 26 : 09:03 AM
अकोल्यात स्क्रॅप बसला भीषण आग... तर या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली
अकोला शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी ते मलकापूर परिसरात आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास स्क्रॅप मालवाहू बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. तर स्क्रॅप बस क्रेनच्या सहाय्याने वाहतूक केली जात असताना बसचे टायर प्रचंड गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन मोठा गोंधळ उडाला होता. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
12 Feb, 26 : 08:41 AM
मुंबईतील भायखळा येथे इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी
मध्य मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या 'जयकृपा टॉवर'मध्ये एक विचित्र घटना घडली. १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्याने ५ जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.