10 Feb, 26 05:22 PM
पायलटचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट, विमान क्रॅश करायचीच मानसिकता होती का?; रोहित पवारांना संशय
अजित पवार अपघाती मृत्यू प्रकरणी रोहित पवार यांनी प्रेझेन्टेशन करत उपस्थित केले सवाल...
१. दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे यामागचे कारण काय?
२. केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल आणि एटीसी ट्रान्सस्क्रिप्टमधील वेळांमध्ये विसंगती का?
३. दृश्यमानता कमी होती तर लँड का केले?
४. विमानाचा आवाज वेगळा का येत होता? ट्रान्सपॉन्डर बंद होता की बंद केला होता?
५. पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट होता. दारू प्यायल्याबद्दल त्याला तीन वर्षे निलंबित केलं होतं.
६. पायलटवर कुाचा दबाव होता का? त्याने अवघड रनवेची निवड का केली?
७. मृत्यू समोर असतानाही मुख्य पायलट गप्प होता याचा अर्थ काय घ्यायचा?
८. विमान क्रॅश करायचीच मानसिकता होती का?
९. पायलटवर कुणाचा दबाव होता का?
१०. फॉरेन्सिकची टीम उशिरा का आली?
10 Feb, 26 04:40 PM
अजितदादांचं घड्याळ, स्वेटर पाहिला, अन्....
"अजित पवार परत येतील, त्यांचा अपघातात मृत्यू झालेलाच नाही, अशा पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतात. अजितदादांच्या विमानाचा अपघात झालाय, ते आता आपल्यात नाहीत, हे खरं तर कुणाच्याच मनाला पटत नव्हतं. मात्र, जेव्हा त्यांचं घड्याळ, जळलेला स्वेटर पाहिला, तेव्हा मन आणि डोकं सुन्न झालं. अजित पवारांचं घड्याळ नेहमी १५ मिनिटं पुढे असायचं. अपघातस्थळी सापडलेल्या त्यांच्या घड्याळात ९ वाजले होते"- रोहित पवार
10 Feb, 26 04:35 PM
अजितदादांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवारांकडून VSR कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि दादांचे पुतणे रोहित पवार यांनी आज व्हीएसआर कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. २०२३ मध्ये मुंबई एअरपोर्टवर याच व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानाचाच अपघात झाला होता, त्याच्या चौकशीचा अहवाल अद्याप का आलेला नाही?, या कंपनीचा डीजीसीएवर इतका होल्ड आहे का?, त्यांना अजूनही का थांबवलं जात नाही?, असे सवाल रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत. विमान पूर्णपणे नादुरुस्त होतं का, 'टेक ऑफ'पूर्वी सर्व प्रोसेस पूर्ण केल्या होत्या का, याची उत्तरंही आम्हाला मिळायला हवीत असं त्यांनी स्पष्ट केलं. विमानात वॉर्निंग सिस्टम कार्यरत नव्हती, असा आरोपही त्यांनी केला. इतर मंत्र्यांच्या, नेत्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या अपघाताची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करायला हवी, असंही त्यांनी नमूद केलं.
10 Feb, 26 04:05 PM
दुर्दैवी! बारावीच्या परीक्षेला चाललेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू
डोंबिवलीत राहणाऱ्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा आज लोकलमधून पडून मृत्यू झाला. बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर देण्यासाठी तो कळव्यातील परीक्षा केंद्रावर निघाला होता. त्यावेळी लोकलमधील गर्दी त्यांच्या जीवावर बेतली. मुंब्रा - कळवा स्थानकांदरम्यान तोल जाऊन तो खाली पडला.
10 Feb, 26 03:08 PM
उद्धव ठाकरेंना न विचारताच भाजपाला पाठिंबा?, चंद्रपूरमध्ये कुणाच्या संमतीने झाली 'युती'?
चंद्रपूरमध्ये ठाकरेसेनेच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर निवडून आला, तर उपमहापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानव विजयी झाले. या निवडणुकीत भाजपा - ठाकरेसेनेची युती झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच, हे सगळं उद्धव ठाकरेंना न विचारताच झाल्याची अधिकच धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपासोबत जाण्याची भूमिका पक्षाने घेतलेली नव्हती, असा बॉम्ब ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी फोडला आहे. तसंच, या सहा नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. त्यानंतर, जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी, आपण हा निर्णय वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसारच घेतल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता चंद्रपूर प्रकरणावरून ठाकरेसेनेत अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय.
10 Feb, 26 02:25 PM
सुनेत्राताई पवार यांचे केवळ शब्दसुमनांनी औपचारिक स्वागत
सुनेत्रा पवार यांनी अजित दादांच्या निधनानंतर पदभार स्वीकारला. ज्या परिस्थितीत आजची बैठक झाली, त्यानुसार आम्ही केवळ शब्दसुमनांनी सुनेत्राताई पवार यांचे स्वागत केले. त्या भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करतील. त्यांच्या पक्षाच्या विषयात मी काहीही बोलणार नाही.
10 Feb, 26 02:20 PM
जलसिंचन विभागातील ४० प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीमंजूरी
जलसिंचनाचे ४० प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीला मान्यता देण्यात आली आहे. जलसिंचन प्रकल्प आणि कॅनॉल वर्षभरात पूर्ण केले जातील. ८ लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. तिसरी मुंबईच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत.
10 Feb, 26 02:15 PM
पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केलं जाणार- मुख्यमंत्री फडणवीस
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचे विमानतळ पुरंदर येथे होणार आहे. या विमानतळाच्या भूमी अधिग्रहणाला आणि त्यासाठीच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. १ जूनपर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे निर्देश दिले आहेत.
10 Feb, 26 02:13 PM
"ज्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते, त्यांना पोटदुखी"; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठी आणि हिंदी भाषेबाबत मुंबईच्या कार्यक्रमात मत मांडले होते. त्यावरून राज ठाकरे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सुनावले. ज्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते, ते अशा प्रकारची टीका करतात, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना लगावला,
10 Feb, 26 02:07 PM
चंद्रपूरमध्ये भाजपाचा महापौर बसल्याचा आनंद, त्यांना शुभेच्छा- मुख्यमंत्री
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या संगीता खांडेकर या महापौर झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनिर्वाचित महापौरांना शुभेच्छा दिल्या.
10 Feb, 26 01:58 PM
ईश्वरचिठ्ठीने ठरला उपमहापौर
चंद्रपूर महापालिकेतील महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. २३ नगरसेवक असलेल्या भाजपाने सगळी गणितं व्यवस्थित जुळवून २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा पराभव केला. अवघ्या एका मताने भाजपाच्या संगीता खांडेकर महापौर निवडणुकीत विजयी झाल्या. त्यांना ३२ मतं मिळाली. त्यानंतर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दानव आणि काँग्रेस पुरस्कृत जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख यांना ३२-३२ मतं मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या एका नगरसेवकाने पप्पू देशमुखांना मत दिलं होतं. त्यामुळे मतं समसमान झाली. शेवटी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली, त्यात प्रशांत दानव यांचं नाव निघालं आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.
10 Feb, 26 01:32 PM
कोकणवासीयांना गुड न्यूज! महाशिवरात्रीसाठी ६ विशेष ट्रेन
महाशिवरात्रीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. देशभरात शेकडो शिवमंदिरे असून, या सर्व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. यंदा, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाशिवरात्री २०२६ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (वाचा संपूर्ण बातमी)
10 Feb, 26 12:57 PM
लोकसभेत गदारोळ सुरूच; कामकाज तहकूब
माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील डोकलाम संदर्भातील दाव्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील वाक्-युद्ध लोकसभेत अजूनही सुरू आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा सोडायला तयार नाहीत. पेंग्विन पब्लिकेशनने हे पुस्तक आपण प्रकाशित केलं नसल्याचं म्हटलंय. मात्र, नरवणे यांनीच या पुस्तकाची लिंक दिली होती आणि ते ॲमेझॉनवर उपलब्ध असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. केंद्रीय बजेटवर चर्चा करण्याची विनंती संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू सातत्याने करत आहेत, मात्र विरोधकांनी पुस्तकाचाच विषय लावून धरला आहे. त्यावरून झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं.
10 Feb, 26 12:54 PM
अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार! उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताना भावूक आवाहन
अजित पवार यांची स्वप्ने पूर्ण करणे हीच प्राथमिकता असेल म्हणत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारला.
10 Feb, 26 12:21 PM
HDFC बँकेकडून ग्राहकांना दिलासा, कर्ज स्वस्त होणार
एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत एमसीएलआर (MCLR) म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये कपात केली आहे. बँकेनं निवडक कालावधीसाठी एमसीएलआर ५ बेसिस पॉइंट्सनं कमी केलाय. विशेष बाब म्हणजे, केवळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या एमसीएलआरमध्ये ५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.०५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
10 Feb, 26 12:19 PM
चंद्रपुरात भाजपाने 'गेम' फिरवला; ठाकरेसेनेचा पाठिंबा मिळवत महापौर बसवला!
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं आहे. शिवसेना (उबाठा) गटाचा पाठिंबा मिळवत , सव्वा-सव्वा वर्ष महापौर करण्याचा फॉर्म्युला ठरवून भाजपाने आज चंद्रपुरात आपला महापौर बसवला. भाजपाच्या संगीता खांडेकर ३२ मतं मिळवून अवघ्या एका मताने विजयी झाल्या. वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहणं आणि एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेणं भाजपच्या पथ्यावर पडलं.
10 Feb, 26 12:12 PM
पत्नीनं केलेल्या आरोपांवर गोविंदाने मौन सोडलं...
10 Feb, 26 10:52 AM
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. ३१ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी विधीवत कामकाजाला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री आणि अनेक आमदार उपस्थित होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांनी राज्याच्या समृद्धीसाठी आणि नवीन जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीलाही भेट दिली.
10 Feb, 26 10:25 AM
ना भाजपा, ना एमआयएम; महापौर निवडणुकीत उद्धवसेना तटस्थ राहणार
छत्रपती संभाजीनगर महापौर पदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाचा महापौर, तर शिंदेसेनेचा उपमहापौर असे समीकरण ठरले आहे. एमआयएमनेही महापौर पदाचा उमेदवार दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला बहुमत आहे. त्यात उद्धवसेना कोणाला मतदान करण्याची भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता होती. पण उद्धवसेना निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.
10 Feb, 26 10:11 AM
युपीआयद्वारे पीएफ काढता येणार: कसा आणि कधी? तपशील जाणून घ्या
ईपीएफओ सदस्य लवकरच नवीन मोबाईल ॲपद्वारे युपीआयच्या माध्यमातून थेट पीएफ पैसे काढू शकतील. या ॲपद्वारे पासबुकमधील शिल्लक तपासता येईल. ईपीएफओकडे बँकिंग परवाना नसल्यामुळं ते आपल्या सदस्यांना थेट ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ शकत नाहीत, असं सूत्रांनी सांगितलं. तरीही, ईपीएफओच्या सेवा बँकांच्या बरोबरीच्या असाव्यात आणि सदस्यांना अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा मिळाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे.
सविस्तर वाचा...
10 Feb, 26 09:49 AM
सुनेत्रा पवार आधी सिद्धिविनायक मंदिरात, मग चैत्यभूमीवर; आज पदभार स्वीकारणार
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत. त्याआधी त्या मुंबईत आल्या. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
10 Feb, 26 09:46 AM
सुनेत्रा पवारांनी पदभार स्विकारण्यापूर्वी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पदभार स्विकारण्यापूर्वी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले. यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
10 Feb, 26 09:45 AM
वीकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात
Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सकाळी निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह २५,९०० च्या वर व्यवहार करत होता. त्याच वेळी सेन्सेक्स १८५ अंकांच्या वाढीसह ८५,२४० च्या वर होता. बँक निफ्टी ६०,६९९ च्या आसपास सपाट पातळीवर व्यवहार करत होता.
10 Feb, 26 09:07 AM
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची सिद्धिविनायक मंदिराला भेट
राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि त्यांची कन्या आमदार सना मलिक यांनी आज सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली.
10 Feb, 26 09:00 AM
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार
इम्फाळ - मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात सोमवारी दुपारी सशस्त्र टोळ्यांनी लिटान सारेइखोंग गावात घरांना आग लावल्यानंतर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचारामुळे ग्रामस्थांना घरदार सोडून शेजारील कांगपोकपी जिल्ह्यातील सुरक्षित भागात आश्रय घ्यावा लागला आहे. (अधिक बातमी वाचा)
10 Feb, 26 08:58 AM
त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल शासनाला सादर
मुंबई - त्रिभाषा धोरण समितीने भाषा सूत्रासंदर्भातील अहवाल शासनाला सोमवारी सादर केला. मात्र, त्यासोबत शालेय शिक्षणात आर्टिफिशियल तंत्रज्ञानाची गरज हा पूरक अहवालही सादर करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, आर्टिफिशल इंटेलिजन्सवर पूरक अहवाल हा त्रिभाषा धोरणाशी संबंधित नाही, तरीही हा पूरक अहवाल दिला गेल्याबाबत तज्ज्ञांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. (अधिक बातमी वाचा)
10 Feb, 26 08:42 AM
खळबळजनक! जुहू समुद्रकिनाऱ्यावर पोत्यात आढळला शिर नसलेला मृतदेह
मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर एका पोत्यात पुरुषाचा कुजलेला आणि शिरच्छेद केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासाचक्र वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख पटवली असून, या प्रकरणी संशयाच्या सुईवरून मृताच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
10 Feb, 26 08:28 AM
लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करा; भाजपची मागणी
संसदेच्या चालू अधिवेशनात झालेल्या गदारोळाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या वर्तवणुकीबद्दल भारतीय जनता पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात भाजप महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहून, लोकशाही संस्थांची बदनामी करणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी या पत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचेही आभार मानले आहेत. अशा तणावाच्या परिस्थितीतही अध्यक्षांनी ज्या पद्धतीने लोकसभेची प्रतिष्ठा, सभ्यता आणि पावित्र्य जपले, त्याबद्दल त्यांनी ओम बिर्ला यांचे कौतुक केले.