‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:00 IST2025-12-21T18:59:48+5:302025-12-21T19:00:30+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला, असेही अजित पवार यांनी सांगितले.

‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान
मुंबई - आज जाहीर झालेल्या नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषद निवडणुकीच्या निकालांनंतर व्यक्त केली. हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला, असेही अजित पवार यांनी सांगितले.
जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामाला, कार्यक्षम नेतृत्वाला पसंती दिली आहे. राज्याचा सर्वांगीण विकास, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी आम्ही घेतलेले निर्णय मतदारांना भावले आहेत. हा विजय महायुतीचा सामूहिक विजय आहे. आम्ही जिथे एकत्र लढलो तिथे मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि जिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या तिथेही लोकशाहीचा आदर करण्यात आला. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्येही आम्ही याच ताकदीने आणि समन्वयाने पुढे जाऊ.राज्यातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व विजयी उमेदवारांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
सरकारने गेल्या वर्षभरात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे निर्णय घेतले,योजनांची, कामांची गतीने अंमलबजावणी केली, त्याचेच हे यश आहे.केंद्र सरकारचेही आम्हाला भक्कम पाठबळ मिळत आहे. नगरपालिकांच्या माध्यमातून शहरांचा कायापालट करणे, पाणीप्रश्न सोडवणे आणि रस्ते-आरोग्य सुविधांना प्राधान्य देणे हेच आमचे पुढील उद्दिष्ट असेल. राज्यातील जनतेने विकासाकडे बघून महायुतीला जे प्रचंड यश प्राप्त करून दिले आहे, त्याबद्दल राज्यातील तमाम जनतेचे, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अजित पवार यांनी आभार मानले व धन्यवाद दिले आहेत.
यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव-शाहू-फुले- आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेनुसारच काम करत राहील. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपण्याचे काम करेल.या यशामुळे महायुतीची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जबाबदारी वाढली आहे. आम्हाला,आमच्या जिंकून आलेल्या सर्व नगराध्यक्षांना, नगरसेवकांना आता झोकून देऊन काम करावे लागेल,असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.