Maharashtra Kesari 2025 :'महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार'; पंच निर्णयाच्या वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:48 IST2025-02-04T15:45:40+5:302025-02-04T15:48:40+5:30
Maharashtra Kesari 2025 : या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. या स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने विजय मिळवला.

Maharashtra Kesari 2025 :'महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार'; पंच निर्णयाच्या वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आक्रमक
Maharashtra Kesari 2025 ( Marathi News ) : या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडल्या. या स्पर्धा वादात सापडल्या आहेत. पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मॅटवरील सेमीफायनल मॅच झाली, यावेळी शेवटच्या क्षणी मोहोळ याला विजयी घोषित केले. यावेळी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. यावरुन या स्पर्धेत वाद वाढला. राज्यभरातून या स्पर्धेवर प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं,त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या,तर त्याचं मला समाधान वाटेल नसेल तर मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा,येत्या २ दिवसात कुस्तीगिरी परिषदेला परत देणार असल्याचं पै. चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.
शिवराज राक्षे याला पंचांच्या लाथ मारण्याच्या घटनेवरून पंचाला गोळ्या खायला पाहिजे होतं,असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता पंच निर्णयावरून चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘त्या’ पंचाला गोळ्या घाला
शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे वादग्रस्त विधान सांगलीतील उद्धवसेनेचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी केले. तर शिवराजच्या कुस्तीत फिक्सिंग झाले असून पंचांवर कुस्ती संघाने कारवाई करावी, अशी मागणी राक्षे कुटुंबीयांनी केली आहे.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य सामन्याच्या निकालावरून राक्षे याने थेट पंचांची कॉलर पकडली आणि त्यांना लाथ मारली. त्यावर चंद्रहार पाटील म्हणाले, पृथ्वीराज मोहोळ याचे मी अभिनंदन करतो. त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे. त्यामुळे राक्षेने लाथ मारून चूक केली, खरं तर त्याने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मीही २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. त्यामुळे पंचांच्या चुकीच्या निर्णयाने एखाद्या चांगल्या खेळाडूचे करिअर अडचणीत येते, हे मी स्वत: अनुभवले आहे. त्यामुळे मी माझ्या मताविषयी ठाम आहे.