मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 06:35 IST2025-07-18T06:35:13+5:302025-07-18T06:35:41+5:30
Maharashtra Hone trap Scandal:

मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला.
या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला तयार नाही, हे धक्कादायक असल्याचे पटोले म्हणाले. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता चिंताजनक आहे. या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव या सगळ्यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले म्हणाले.
हनी ट्रॅपची खरोखरच चौकशी सुरु आहे का? : दानवे
हनी ट्रॅपमुळे सरकारच्या कामकाजातील गुप्तता, महत्वाच्या फाईल्स बाहेर गेल्याची चर्चा आहे. राज्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे योग्य नाही. यातून मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मेलींगचे प्रकार होत आहेत. त्यामुळे हनी ट्रॅपची खरोखरच चौकशी सुरु आहे का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला केला.
हनी ट्रॅप प्रकरणावर चर्चा करण्यासाठी दानवे यांनी नियम २९१ अन्वये सभागृहात प्रस्ताव मांडला. परंतु, तो सभापतींनी नाकारला. परंतु, हा २९१ कसा होतो हे सांगताना दानवे म्हणाले. राज्यातील राजकीय नेते व काही वरिष्ठ स्तरावरील अधिकारी हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्यावेळी असे ट्रॅपिंग करणारे लोक केंद्र सरकारने पकडले होते. अशा हनी ट्रॅपमुळे राज्याची प्रशासकीय स्तरावरील गुप्त माहिती व महत्त्वाच्या फाइल बाहेर गेल्याची माहिती आहे.
शासकीय कामकाजात याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. राज्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय असल्याने सभापतींनी दालनात हा विषय मंजूर केला नसला तरी सरकारने यावर भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.