Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:16 AM2019-11-23T03:16:42+5:302019-11-23T06:10:04+5:30

महाविकास आघाडीचे ठरले; राजकीय अस्थिरता अखेर संपुष्टात

Maharashtra Government: Uddhav Thackeray to be CM; Claim to establish power today | Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

Maharashtra Government : उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री; आज करणार सत्तास्थापनेचा दावा

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आली असून, उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना नेत्यांच्या शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे सांगितले. त्यानंतर सर्व सेना नेत्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले, असे खा. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेस नेत्यांनी धरला होता. मात्र, उद्धव यांनी तेव्हा त्यास अद्याप होकार दिला नव्हता. बैठकीनंतर शिवसेना नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. तिथे सेनेच्या नेत्यांनीही उद्धव यांना आपणच मुख्यमंत्री व्हा, असा जोरदार आग्रह केला. तो उद्धव यांनी मान्य केला, असे खा. राऊत म्हणाले.

आज भेटणार राज्यपालांना
तिन्ही पक्षांचे नेते शनिवारी संध्याकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी तिन्ही पक्षांचे नेते भेटणार असून, उर्वरित मुद्यांवर चर्चा करणार आहे.

१५:१५: १२ चा फॉर्म्युला
फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रीपद तसेच १० कॅबिनेट व पाच राज्यमंत्रिपदे असतील. राष्ट्रवादीकडे ११ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रीपदे तर काँग्रेसकडे ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रीपदे असतील.
विधानसभाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे यासाठी दिलीप वळसे-पाटील तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.

हे नेते होते बैठकीसाठी हजर
राष्ट्रवादी : शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवार
शिवसेना : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे
काँग्रेस : अहमद पटेल, के.सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान

संभाव्य खातेवाटप
शिवसेना : नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी व न्याय, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, वित्त व नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, वने व पर्यावरण, शालेय शिक्षण, युवक कल्याण, सांस्कृतिक, मराठी भाषा, पर्यटन, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य व आदिवासी विकास.
राष्ट्रवादी : गृह, सहकार, ऊर्जा, अपारंपारिक ऊर्जा, उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण, रोजगार हमी, कामगार व कौशल्य विकास, पणन व वस्त्रोद्योग
काँग्रेस : महसूल, उद्योग, ग्रामविकास, कृषी, पाणीपुरवठा, उच्च व तंत्रशिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन (एफडीए), सामाजिक न्याय, पशुसंवर्धन व दुग्धविकास व अल्पसंख्यांक
 

Web Title: Maharashtra Government: Uddhav Thackeray to be CM; Claim to establish power today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.