Maharashtra Government: ... So Shiv Sena MLAs refuse to go to Jaipur | Maharashtra Government: ...म्हणून शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार
Maharashtra Government: ...म्हणून शिवसेना आमदारांनी जयपूरला जाण्यास दिला नकार

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली अत्यंत गतिमान असताना शिवसेनेच्या आमदारांना जयपूरला पाठविण्याचे नक्की झाले होते पण आमदारांनीच विरोध केल्याने जयपूरची विमान तिकिटे रद्द करण्यात आली.

शिवसेना आमदारांची बैठक दुपारी १२ वाजता मातोश्रीवर होती पण त्याच्या दोन तास आधीच आमदारांना बोलावण्यात आले होते. त्यानुसार एकेक आमदार दाखल झाले. बैठकीनंतर तुम्हाला जयपूरला जायचे आहे, बोर्डिंग पासही तयार आहेत असे त्यांना सांगण्यात आले. प्रत्यक्ष बैठकीत आमदारांनी जयपूरला पाठवू नका, आम्ही मुंबईतच राहतो, असा पवित्रा घेतला आणि जयपूरला जाण्याचे बारगळले.
आमदारांनी सांगितले की, आमच्या मतदारसंघांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी जयपूरला जाऊन राहणे योग्य दिसणार नाही. शिवाय मतदारसंघात काही परिस्थिती अचानक उद्भवली तर जयपूरहून तेथे लगेच पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे एकत्रितच ठेवायचे असेल तर आम्हाला मुंबईत राहू द्या.

‘आमच्यापैकी सर्वच आमदार निष्ठावान आहेत. कोणाच्याही मनात गद्दारीचा लवलेशदेखील नाही. आम्ही उद्धवजींच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत’, असे या आमदारांनी सांगितले. शेवटी आमदारांची व्यवस्था मुंबईतीलच एका पंचतारांकित हॉटेलात करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Government: ... So Shiv Sena MLAs refuse to go to Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.