Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 13:02 IST2019-11-26T13:00:07+5:302019-11-26T13:02:11+5:30
राष्ट्रवादी, पवार कुटुंबाकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू

Maharashtra Government: राष्ट्रवादीचे नेते म्हणताहेत, 'परत या'; पण अजित पवारांनी थेट गाठलं 'वर्षा'
मुंबई: राष्ट्रवादीतून बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू आहेत. त्यांच्या मनधरणीसाठी पवार कुटुंबानंदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही अजित पवारांना भावनिक साद घालत त्यांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवार भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी वर्षावर निघून गेले. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता धूसर झाली आहे.
शनिवारपासून राष्ट्रवादीकडून अजित पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीत परतण्याचं आवाहन केलं. याशिवाय पवार कुटुंबीयांकडूनही अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडून अजित पवारांचे समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याचीदेखील शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते, पवार कुटुंबाकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना अजित पवार थेट वर्षावर पोहोचले. विधानसभेत उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षावर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्य सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत.