अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 20:08 IST2025-09-26T20:03:23+5:302025-09-26T20:08:25+5:30
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी भाऊबीजेची भेट जाहीर केली आहे.

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट मिळणार
Anganwadi Sevika: राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड केली आहे. दिवाळीला अद्यापही काही वेळ असताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांना दिवाळी निमित्त दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४०.६१ कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनीही याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे बालकांच्या पोषण व महिलांच्या आरोग्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या कार्यात नवउत्साह वाढेल, असं अमित साटम म्हणाले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट दिली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला आणि बालकांच्या संगोपनासाठी, पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर केली आहे. त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी राज्यभर चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. या सेविकांच्या अथक प्रयत्नांमुळे बालकांचा विकास, पोषण, तसेच महिलांच्या आरोग्यसंबंधी… pic.twitter.com/dTUoSJl0Ew
— Ameet Satam (@AmeetSatam) September 26, 2025
"महाराष्ट्रातील बालकांच्या पोषणासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी राज्यभर चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय निष्ठा, समर्पण आणि निःस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. या सेविकांच्या अथक प्रयत्नांमुळे बालकांचा विकास, पोषण, तसेच महिलांच्या आरोग्यसंबंधी उपक्रम यशस्वीरीत्या अंमलात आणले जात आहेत. राज्य सरकारने त्यांच्या या निःस्वार्थ सेवेचा सन्मान करत दरवर्षीप्रमाणे यंदाही “भाऊबीज भेट” देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाला २००० ची खास भेट रक्कम प्रदान केली जाणार आहे. यासाठी ४०.६१ कोटींच्या निधीस त्वरित मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या पुढाकारातून त्यांच्या सेवेला प्रोत्साहन मिळेल आणि पुढील काळातही बालकांच्या पोषण व महिलांच्या आरोग्यासाठी केलेल्या कार्यात नवउत्साह वाढेल, असं अमित साटम यांनी म्हटलं.