Maharashtra election 2019 Shiv Sena mp Sanjay Raut admitted at Lilavati hospital | महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर सतत टीकेचे बाण मारणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्यानं राऊत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन दिवस ते रुग्णालयात असतील. गेल्या काही दिवसापासून भाजपाला सतत अंगावर घेणारे राऊत रुग्णालयात दाखल झाल्यानं आता त्यांची जबाबदारी कोण सांभाळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत होते. कामाचा व्याप वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. मात्र त्याकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं. अखेर आज कुटुंबीयांच्या आग्रहाखातर ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर डॉ. जलील पारकर यांची टीम उपचार करणार आहे. पुढचे दोन दिवस राऊत यांच्यावर उपचार होतील. 

संजय राऊत यांच्यावर अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे. याबद्दलचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या वेळापत्रकात बदल झाला होता. याशिवाय त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला होता. पुढील दोन दिवस राऊत यांच्यावर उपचार चालणार असल्यानं ते राजकीय घडामोडींपासून दूर राहतील. त्यांच्यावर सध्या असणारी जबाबदारी खासदार अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. 

थोड्याच वेळात डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अँजिओग्राफीबद्दलचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिली. संजय राऊत यांची प्रकृती गंभीर नाही. नियमित उपचारांचा भाग म्हणून ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्यापर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं सुनील राऊत यांनी सांगितलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra election 2019 Shiv Sena mp Sanjay Raut admitted at Lilavati hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.