महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 22:54 IST2019-11-13T22:54:09+5:302019-11-13T22:54:36+5:30
आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार
मुंबई: गेल्या आठवड्यापासून हॉटेल रिट्रीटमध्ये असलेल्या आमदारांना मतदारसंघात जाण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं सुरू असल्यानं शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना एकाच ठिकाणी ठेवलं होतं. मात्र आता शिवसेनेचे आमदार त्यांच्या मतदारसंघात निघाले आहेत. या आमदारांना १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १७ तारखेला बाळासाहेबांचा सातवा स्मृतिदिन आहे.
राज्यात सत्ता संघर्ष तीव्र झाल्यानंतर शिवसेनेनं सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आमदारांचा मुक्काम रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आला. आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं होतं. मात्र भाजपा, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलादेखील बहुमताचा दावा करण्यात अपयश आलं. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं आमदारांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले.
भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र याचवेळी शिवसेनेचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. तरीही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं आपल्या सर्व आमदारांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवलं. दरम्यान घोडेबाजाराचा आरोप भाजपानं फेटाळून लावला. आमदार फोडणं आमची संस्कृती नाही. ते नैतिकतेला धरुन नाही, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.