महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 16:07 IST2019-11-07T16:03:20+5:302019-11-07T16:07:12+5:30
आमदारांची फोडाफोड करण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'कुणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतली भाजी आहे का?'
मुंबई: सर्वात मोठ्या पक्षाकडून आमदारांच्या फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये एकत्र आले आहेत. तत्पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिलेला शब्द पाळण्याचं आवाहन भाजपाला केलं. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलसाठी रवाना झाले.
मातोश्रीवरील बैठकीनंतर निघालेल्या आमदारांनी पक्षप्रमुख घेतील, त्या निर्णयामागे ठाम असल्याचं म्हणत शिवसेना मागण्यांवरून मागे हटणार नसल्याचं सांगितलं. यावेळी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. 'शिवसेनेचा एकही आमदार फुटू शकत नाही. ज्याला हिंमत करायची आहे, त्यानं ती करून पाहावी. कोणीही उचलून न्यायला आमदार म्हणजे काय मंडईतील भाजी आहेत का?,' असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा आमदार फोडूनच दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सर्व आमदारांनी एकत्र राहायला हवं. त्यामुळे शिवसेनेचे आमदार रंगशारदा हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयामागे सर्व आमदार ठामपणे उभे राहतील, असंदेखील ते म्हणाले. तर आमदार फोडायचा प्रयत्न शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.