maharashtra election 2019 ncp chief sharad pawar hits out at cm devendra fadnavis over wrestling remarks | Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला
Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला

नाशिक: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्यातील शेती आणि उद्योग संकटात सापडला आहे. मात्र यातून राज्याला बाहेर काढण्याची धमकी सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असलेल्या सरकारकडून केवळ सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याची टीका पवारांनी केली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्यासह केंद्र सरकारलादेखील लक्ष्य केलं. 

वर्ल्ड हंगर इंडेक्समध्ये भारताची कामगिरी पाकिस्तानपेक्षाही सुमार असल्याचं वृत्त काल समोर आलं. त्याचा संदर्भ देत भाजपाच्या काळात जागतिक पातळीवर देशाची एवढी बेईज्जती झाल्याचं पवार म्हणाले. 'मुलांना अन्नाचा पुरवठा करण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी अतिशय वाईट आहे. आपल्यापेक्षा नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये मुलांना अधिक अन्न मिळतं. आपल्या देशासाठी ही बातमी चांगली आहे का?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जो देश जगात अन्नधान्याची निर्यात करतो, त्या देशातल्या मुलांना खायला अन्न मिळत नाही, अशी बातमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध होते. इतकी बेईज्जती भाजपाच्या काळात झाली, अशा शब्दांमध्ये पवारांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. 

केंद्रासह राज्य सरकारचादेखील पवारांनी समाचार घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कारखाने आजारी आहेत. मंदीचं संकट आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. इतकी संकटं राज्यासमोर आहेत. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारी धमक सरकारमध्ये नाही. प्रश्न सोडण्याऐवजी विरोधकांना संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशा शब्दांत पवार राज्य सरकारवर बरसले.  
 


Web Title: maharashtra election 2019 ncp chief sharad pawar hits out at cm devendra fadnavis over wrestling remarks
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.