Maharashtra Election 2019 : 'If Ajit Pawar tells us where to dance, cantr cry clearly. says laxman dhobale in solapur | Maharashtra Election 2019 : 'अजित पवार कुठं कुठं नाचतात हे सांगितलं, तर हुंदका आवरता येणार नाही'

Maharashtra Election 2019 : 'अजित पवार कुठं कुठं नाचतात हे सांगितलं, तर हुंदका आवरता येणार नाही'

सोलापूर - राष्ट्रवादीत अजूनही न उभारी घेतलेले नेते अजित पवार हे मंगळवेढयाला भाषण करण्यासाठी येवून गेले. काही दिवसापुर्वी शिवसेनेचे माजी नेते व सध्याचे राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे यांची गर्दी आणि अजित पवारांच्या सभेची गर्दी पाहिली तर फार मोठी तफावत होती. त्यातून एकच सांगावेसे वाटते की अजितदादा तुमचा टीआरपी आता घसरलाय, असे म्हणत लक्ष्मणराव ढोबळेंनी अजित पवार यांच्यावर टीका केली. तसेच त्यांच्यावर केलेल्या टीकेलाही ढोबळे यांनी प्रत्युत्तर देत, आपण आता भाजपाच्या सभेबद्दल व नेत्यांबद्दल बोलताना दहा वेळा विचार करूनच बोलावे, असे ढोबळेंनी म्हटले.

आज अश्रूची झाली फुले. हे नाटक घेवून अजित पवार शिखर बँकेत केलेल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी अनावर झालेले डोळयातील अश्रू पुसत मंगुडयात आले, आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याबद्दल वाईट वकटं बोलले. काटेवाडीत वाढल्यामुळे महाराष्ट्रात काटे घेवूनच ते फिरत असतात. धनगर समाजाचे समंजस कर्तबगार नेतृत्व राम शिंदे यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला संपत्तीच्या जोरावर कर्जत-जामखेड मतदारसंघात कोलदांडा घालण्याचे पाप त्यांनी केले आहे. पवार साहेब सगळं जुळवून आणतात आणि तुम्ही एका दिवसात, एका शब्दात, एका आवाजात सगळी रांगोळी मोडून टाकता. हे अवघा महाराष्ट्र पाहतोय. 

आजही यमाईचा तलाव आहे. भरपूर पाणी आहे आणि माझ्यावर बोलून सगळं पाणी खारट केलं. अजितदादा मी जेव्हा बारामतीत येत होतो त्यावेळेला गाडीत डोकावून बोलताना मी पाहिलं आहे. पवार साहेबांचा पुतण्या म्हणून मी तुमचे लाड केले. सांभाळून घेतलंय. त्यामुळे मला तुम्ही लहानच आहात. मी माझ्या पक्षाचा झेंडा घेऊन नाचलोय, पण तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लाऊ नका. जर तुमच्याबद्दल मी तोंड उघडले तर अश्रू आवरण्याचा विषय राहणार नाही. हुंदकादेखील आवरता येणार नाही. महाराष्ट्र घडवला वाढवला मोठा केला पवार घराण्यानं. पण, तुम्ही त्याची घडीच विस्कटली आणि सार्‍या राजकारणाचं वाटोळं केलं. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा राजवाडा असलेली बँक मातीत घातली. अन् आता शेतकर्‍यांबद्दलचा खोटा कळवळा दाखवताय, तरी आम्ही हे निमूटपणे सहन करतोय. 

कधी काळी मंगळवेढयाच्या सभेत आमचा अपमान करीत, आम्हाला शेलक्या शब्दात शिव्या देत मंगळवेढयात आलात. त्यावेळेस महाराष्ट्राचे कुलदैवत, आम्हा सगळयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाबद्दल शिवप्रेमींनी आपणास साकडे घातले. त्यावेळेस आपण चुटकीसरशी हा प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. आज किती वर्षे झाली, हे तरी आपणास माहित आहे काय? शिवप्रेमींना झुलवत ठेवायचे. खोटी आश्वासने द्यायची आणि प्रश्न प्रलंबित ठेवायचे ही तर आपली नेहमीची सवय आहे. हे आता आमच्या लक्षात आलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेला न भुतो न भविष्यति अशी गर्दी झाली नव्हे तर या गर्दीने मंगळवेढयात उच्चांक स्थापित केला आहे. त्या मानाने आपणाला 25 टक्क्यापर्यंतही पोहचता आले नाही. याचे आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या सभेदिवशी हस्तकांमार्फत चुकीचे मेसेज व्हायरल केले. परंतु, आज आपली सभा ऐकायला पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या बाहेरीलच जास्त लोक आल्याचे मंगळवेढेकरांनी पाहिले आहे. त्यामुळे आमच्या सभेला झालेल्या गर्दीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार आपण मंगळवेढयात येवून गमावला आहे. 

दरम्यान, हलगीच्या तालावर झिंगाट झालेल्या नाच्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. सारखे-सारखे कुंकू बदलणारे तुमच्याशी प्रामाणिक काय राहणार अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर केली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019 : 'If Ajit Pawar tells us where to dance, cantr cry clearly. says laxman dhobale in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.