Maharashtra Election 2019: Before the election results, the Chief Minister announces the names of these 4 ministers | Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्र्याकडून 'या' 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा 
Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या निकालाआधीच मुख्यमंत्र्याकडून 'या' 4 मंत्र्यांच्या नावाची घोषणा 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये भाजपाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री आगामी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावं घोषित करत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार याच विश्वासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात मंत्र्यांची नावे घोषित करत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी ४ मंत्र्यांची घोषणा केली आहे. कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे, माण-खटावमधून जयकुमार गोरे, पुसदमधून निलय नाईक, तर चांदवडमधून राहूल आहेर यांना प्रचारादरम्यान मंत्री बनविणार असल्याची घोषणा केली आहे. कर्जत जामखेडमधून राम शिंदेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवारांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे ही निवडणूक पवारांसाठी प्रतिष्ठीत आहे. याठिकाणी राम शिंदेंना ५० हजारांनी निवडून द्या, त्यांना मंत्री बनवू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाकडून याठिकाणी जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शेखर गोरे हे अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळे माण खटावच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून द्या त्यांना मंत्री बनवणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

तसेच पुसद मतदारसंघातून भाजपाकडून निलय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही मंत्री बनवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचसोबत नाशिकच्या चांदवडमध्ये काँग्रेसच्या शिरीष कोतवालांविरोधात भाजपाकडून राहूल आहेर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राहूल आहेर यांनाही मंत्री बनवू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांची रणनीती किती यशस्वी होणार याबाबत निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. 
 


Web Title: Maharashtra Election 2019: Before the election results, the Chief Minister announces the names of these 4 ministers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.