maharashtra election 2019 congress leader bhai jagtap slams bjp over ethics comment | महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सत्ता स्थापन न झाल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र यानंतर महायुतीमधील दोन मोठे पक्ष असलेल्या शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपांवरुन निर्माण झालेला संघर्ष टोकाला गेला. अखेर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. 

शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी केल्यानं महायुतीमधील दरी रुंदावली. शिवसेना भाजपापासून दूर गेल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. यानंतर भाजपानं सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केलं. ही घोषणा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाला आजच नैतिकता आठवली का, असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. जगताप यांनी एक ट्विट करत भाजपानं याआधी अनेक राज्यांमध्ये कमी जागा जिंकूनही सत्ता स्थापन केली होती, याची आठवण करुन दिली आहे. ‘गोव्यात काँग्रेसला १७, भाजपाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८, भाजपाला २१, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला ८०, संयुक्त जनता दलाला ७१, भाजपाला ५३, मेघालयात काँग्रेसला २१, एनपीपी १९, भाजपाला २ जागा मिळाल्या होत्या. मात्र या सगळ्या राज्यांमध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजपानं नैतिकता गुंडाळून ठेवली होती का? जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करताना लाज भाजून खाल्ली होती की तळून?,’ असे प्रश्न जगताप यांनी विचारले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra election 2019 congress leader bhai jagtap slams bjp over ethics comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.