Maharashtra Election 2019: The banner in Pune attracted the attention of all; Equation to be established for State power? | पुण्यात लागलेल्या 'या' बॅनरने सगळ्यांचं लक्षं वेधलं; सत्तास्थापनेसाठी बनणार नवं समीकरण? 

पुण्यात लागलेल्या 'या' बॅनरने सगळ्यांचं लक्षं वेधलं; सत्तास्थापनेसाठी बनणार नवं समीकरण? 

पुणे - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला असून शुक्रवारी राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद विकोपाला गेला असून महायुतीचं सरकार राज्यात येईल असं चिन्ह दिसत नाही. त्यामुळे राज्यात नेमकं कुणाचं सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

शिवसेना-भाजपाने एकमेकांना खोटं पाडण्याचं राजकारण सुरु केल्याने राज्यात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करतानाच यापुढे राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. तर बहुमत नसताना सरकार कसं स्थापन करणार असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. या दोन्ही पक्षांच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी काय करता येऊ शकतं यावर चर्चा झाली. 

तूर्तास विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यपाल या परिस्थितीवर पुढील निर्णय का घेतात याची वाट बघणार असल्याचं सांगितले आहे. मात्र राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे एकत्र येऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सोशल मीडियापासून सगळीकडे सुरु आहे. अशातच पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो असलेला पोस्टर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अनिस सुंडके यांनी हा पोस्टर लावलेला आहे. सध्या या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या पोस्टरमध्ये लिहिलेला मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रातील जनतेने, महाराष्ट्रातील पावरबाज जनतेने संघर्षातील आदेश स्वीकारला आहे. बळीराजाच्या मनातील अन् हातातील घड्याळाच्या अचूक वेळेत धनुष्यबाणातील अचूक वेधाने जाणता नेता स्वीकारावा असं या बॅनरवर लिहिलं आहे. हा बॅनर पुणेकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. पुण्यात झळकलेल्या या बॅनरने राज्यातील नव्या समीकरणाचे संकेत तर दिले नाहीत ना याचीच चर्चा शहरात सुरु आहे. राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेना आघाडीच्या मदतीने सत्तेत सहभागी होणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत अशा चर्चांना उधाण येणार हे नक्की 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019: The banner in Pune attracted the attention of all; Equation to be established for State power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.