रस्त्यात जखमी दुचाकीस्वाराला पाहताच अजित पवारांनी केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:11 IST2026-01-08T14:00:16+5:302026-01-08T14:11:46+5:30
Ajit Pawar Viral Video: राजकारणातील कामाचा कितीही व्याप असला, तरी माणुसकी सर्वात मोठी असते हे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

रस्त्यात जखमी दुचाकीस्वाराला पाहताच अजित पवारांनी केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!
शिस्त आणि कडक प्रशासनासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवेदनशील पैलू आज सकाळी पुणेकरांना पाहायला मिळाला. पिंपरी-चिंचवडकडे प्रचारासाठी जात असताना, वाटेत झालेल्या अपघातातील जखमी तरुणाला मदत करण्यासाठी त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः रस्त्यावर उतरून जखमीची विचारपूस केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
नेमकी घटना काय?
अजित पवार हे आज गुरुवारी सकाळी त्यांच्या पुणे येथील जिजाई निवासस्थानावरून पिंपरी-चिंचवडमधील नियोजित प्रचारासाठी निघाले होते. त्यांचा ताफा रेंज हिल परिसरातून जात असताना, रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला त्यांना दिसला. वेळेचे महत्त्व ओळखून अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर अजित पवार स्वतः गाडीतून खाली उतरले आणि जखमी तरुणाच्या दिशेने धावले. त्यांनी तरुणाची विचारपूस करत त्याला धीर दिला. कडक सुरक्षा व्यवस्था आणि पूर्वनियोजित कार्यक्रमांची घाई असूनही, पवारांनी माणुसकीला प्राधान्य दिले.
अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी आपल्या ताफ्यासोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. तो तरुण रुग्णालयाकडे रवाना होईपर्यंत अजित पवार तिथेच थांबले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून अजित पवारांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.