देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते? पुणे, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे टॉप १० मध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:52 IST2026-02-05T13:47:35+5:302026-02-05T13:52:36+5:30
Ease of Living Index 2025-26 India: महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२५-२६’ मध्ये महाराष्ट्राने देशात बाजी मारली आहे.

देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते? पुणे, नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे टॉप १० मध्ये!
नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: शहरांमधील जीवनमानाची खरी कसोटी असलेल्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२५-२६ अहवालात महाराष्ट्राने पुन्हा एकदा शहरी विकासातील आघाडी सिद्ध केली आहे. देशातील सर्वोत्तम शहरांच्या पहिल्या दहामध्ये नवी मुंबई, बृहन्मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांचा समावेश झाला असून, विशेषतः सामाजिक जीवनमानाच्या क्रमवारीत तर नवी मुंबईने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
सामाजिक जीवनमानामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, सुरक्षितता, सामाजिक समावेशन व जीवनशैलीचे घटक मोजले जातात. यात तिरुपती प्रथम, तिरुचिरापल्ली दुसरे, तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर चंदीगड, पुणे, बृहन्मुंबई, अमरावती, विजयवाडा, इंदूर ही शहरे आहेत. हा निर्देशांक केवळ चमकदार पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, शहरातील सामान्य नागरिकाच्या दैनंदिन जगण्याचा अनुभव तपासतो.
नवी मुंबईने उमटवला ठसा
विशेष म्हणजे, नवी मुंबईचे नियोजनबद्ध शहरी विकास मॉडेल, हरित क्षेत्रे, सुसज्ज आरोग्य यंत्रणा आणि शैक्षणिक सुविधा यामुळे ती ‘राहायला सोपे’ शहर म्हणून राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवत आहे. दुसरीकडे, मुंबई आणि पुण्यासारखी दाट लोकसंख्येची शहरेही जीवनमानाच्या स्पर्धेत टिकून आहेत, हे या अहवालाचे मोठे यश मानले जात आहे.
सर्वोत्तम १० शहरे
२०२५ च्या एकत्रित क्रमवारीनुसार देशातील टॉप १० शहरे म्हणून पुणे, नवी मुंबई, बृहन्मुंबई, तिरुपती, चंदीगड, ठाणे, रायपूर, इंदौर, विजयवाडा, भाेपाळ यांचा समावेश आहे. यामध्ये पुणे आणि नवी मुंबई ही शहरे शिक्षण, आरोग्य सुविधा, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि नागरिक-केंद्रित प्रशासनात सातत्याने उच्च कामगिरी करत असल्याचे दिसत आहे.
मेट्रो शहरे पिछाडीवर का?
भारताच्या भविष्याचा आरसा ठरणारा निर्देशांक, फक्त मोठे शहर नव्हे, तर चांगले शहर ही संकल्पना अधोरेखित करतो. त्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दहामध्ये नवी मुंबई, बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, वसई–विरार या शहरांचा समावेश आहे. मात्र, ७८ निर्देशकांवर तपासणी होऊनही मेट्रो शहरे का पिछाडीवर पडली? हा प्रश्न अहवालातून ऐरणीवर आला आहे.