Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 06:22 IST2019-11-13T06:21:38+5:302019-11-13T06:22:42+5:30
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही.

Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता आमच्याकडे सहा महिन्यांचा वेळ आहे. सरकार कसे स्थापन करायचे, हे आमच्या तिघांमध्ये ठरल्यावर सरकार स्थापनेचा दावा पुन्हा केला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर उद्धव व आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर, पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उपरोधिक टीका करताना उद्धव म्हणाले की, बहुमताची संख्या दाखविण्यासाठी आम्हाला दोन दिवसांचीही मुदत वाढवून न देणाऱ्या दयावान राज्यपाल महोदयांनी आता (राष्ट्रपती राजवटीची शिफारस करून) आम्हाला सहा महिन्यांचा वेळ दिला आहे. असा मोठ्या मनाचा राज्यपाल सर्वांनाच मिळाला, तर त्या-त्या राज्यांचे व देशाचेही नक्कीच भले होईल!
शिवसेनेला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी व काँग्रेसचा अधिकृत निर्णय झाला नसला तरी त्यांनी नकार दिलेला नाही, हेही सत्य आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याचे सरकार स्थापन करायचे हे काही साधे काम नाही. तिघांनी एकत्र बसून त्यासाठी सामायिक किमान कार्यक्रम ठरवावा लागेल. त्यांच्या मनात काही मुद्दे आहेत. आमच्याही मनात काही मुद्दे आहे. येत्या काही दिवसांत एकत्र बसून या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊन सरकारस्थापनेच्या आमच्या प्रयत्नांवर टीका केली जात आहे. पण भाजपाने काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत व मोदींवर तोंडसुख घेणाºया चंद्राबाबू नायडूंसोबत आंध्र प्रदेशात कसे सरकार स्थापन केले याची माहिती मी मागविली आहे. त्यातून आताच्या या प्रयत्नांत आम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल, असेही ते म्हणाले. आतातरी भाजपासोबतची तुमची युती तुटली असे म्हणायचे का, असे विचारता ठाकरे यांनी युती आम्ही नाही, त्यांनी तोडली आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, हिंदुत्ववादी विचाराने आम्ही एकत्र आलो होतो. अयोध्येतील राम मंदिर हाही त्याचाच एक सामायिक मुद्दा होता. पण एकीकडे एकवचनी रामाचे गोडवे गायचे व दुसरीकडे दिलेली वचने मोडायची असे वागणाऱ्यांशी युती सुरू ठेवण्यात अर्थ तरी काय आहे?