Nagpur: मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने नाराज भुजबळांची सत्काराकडे पाठ, समर्थकांना शल्य
By नरेश डोंगरे | Updated: December 15, 2024 19:31 IST2024-12-15T19:30:40+5:302024-12-15T19:31:07+5:30
Maharashtra Cabinet Expansion: ३३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना आज मंत्री मंडळापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी संतप्त झालेल्या भुजबळांनी स्वपक्षाच्या सत्काराला पाठ दाखविली. या घडामोडीमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Nagpur: मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने नाराज भुजबळांची सत्काराकडे पाठ, समर्थकांना शल्य
- नरेश डोंगरे
नागपूर - ३३ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांना आज मंत्री मंडळापासून दूर ठेवण्यात आले. परिणामी संतप्त झालेल्या भुजबळांनी स्वपक्षाच्या सत्काराला पाठ दाखविली. या घडामोडीमुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले असून, नागपूरच्या बोचऱ्या थंडीत राजकीय वातावरण तापले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्रीमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला. त्याच्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निवासासमोरच्या देशपांडे सभागृहात पक्षाचा मेळावा आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा ठेवला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नागपुरात राष्ट्रवादी राज्यातील नेत्या-कार्यकर्त्यांसमोर शक्तीप्रदर्शन करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानुसार एकीकडे शपथविधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महायुतीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेतेही मोठ्या संख्येत सत्कार समारंभाला जमले होते.
या दोन्ही कार्यक्रमात पुढच्या काही तासांत मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचीही चर्चा होतीच. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी या संबंधाने चुप्पी साधली असली तरी ज्यांना मंत्रीपद द्यायचे, त्यांना पद्धतशिर निरोप गेले होते. अशात पक्षातील ज्येष्ठ-कनिष्ठ सहकाऱ्यांना निरोप मिळूनही मंत्रीपदाबाबत भुजबळ यांना कसलाही निरोप नसल्याने सकाळपासून संबंधितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर, सत्कार समारंभ तसेच मेळाव्याला आज दुपारी सुरूवात झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री अनिल पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुलभा खोडके, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार राजू कारेमोरे, आमदार मनोज कायंदे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, आमदार संग्राम जगताप, आमदार प्रतापराव पाटील, आमदार राजकुमार बडोले माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आदींसह पक्षाचे पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्यांसह सभागृहात येत होते. दीड दोन तास कार्यक्रम चालला. भुजबळ मात्र तिकडे फिरकलेच नाही. त्यांनी सत्काराला पाठ दाखवून आपली नाराजी व्यक्त केली.
मेळाव्यात कुजबूज, प्रतिक्रिया
मंत्रिपदापासून डावलले गेल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतप्त झाल्याची चर्चा मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. 'साहेब' येणार आणि ते या मेळाव्यात आपली भडास काढणार, असे काही भुजबळ समर्थक-कार्यकर्ते कुजबुजत होते. तर, मेळाव्यास उपस्थित राहण्यास भुजबळांनी नकार कळविल्याचेही काही जण सांगत होते. दरम्यान, भुजबळांना डावलल्याची बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्याचेही प्रतिक्रियेतून लक्षात येत होते.