विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:17 IST2026-02-23T11:15:54+5:302026-02-23T11:17:06+5:30
Maharashtra Budget Session 2026 Politics: खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महायुती सरकार, शरद पवारांची प्रकृती आणि विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादी का नव्हती? संजय राऊतांनी सांगितले कारण, अधिवेशनावरून टीका
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय घडामोडींवरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मविआमध्ये राष्ट्रवादीतील कथित फूट, विरोधी पक्षनेतेपद आणि पत्राचाळ प्रकरणावरून त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, मविआमध्ये कोणतीही फूट नाही. काही नेते मुंबईत नसल्यामुळे ते कालच्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला उपस्थित नव्हते, हा केवळ विधिमंडळाचा विषय आहे, त्यातून वेगळा अर्थ काढू नये. मविआची उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा ती जबाबदारी (नेतृत्व) पार पाडावी ही आमची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी आगामी काळातील नेतृत्वाचे संकेत दिले.
महायुतीवर बोचरी टीका
सरकारमधील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवताना राऊत यांनी, "महायुतीमध्ये १०० आचारी आणि रस्सा भिकारी" अशी म्हण वापरून उपरोधिक टीका केली. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी आधी मराठीचा अभ्यास करावा आणि मग बोलावे, असा सल्लाही दिला.
नरहरी झिरवाळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप
"नरहरी झिरवाळ हे गरीब आदिवासी आहेत, त्यांना कदाचित काही गोष्टी कळाल्या नसतील. पण या प्रकरणात क्लीन चिट मिळाली कशी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्र्याच्या दालनात धाडी घातल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन
अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याला मान न देण्यावरून राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. "काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षनेत्याला नेहमी मान दिला जात असे. आता विरोधी पक्षनेत्याशिवाय अधिवेशन चालवणे हा लोकशाहीसाठी घातक अहंकार आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.