हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?
By प्रविण मरगळे | Updated: March 3, 2025 11:10 IST2025-03-03T11:09:18+5:302025-03-03T11:10:06+5:30
Budget Session Maharashtra: आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले.

हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरूवात झाली आहे. या अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. बऱ्याचदा अधिवेशनाच्या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसतात. पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलनास बसतात परंतु आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड विधान भवनात बेड्या घालून पोहचले.
आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून का आलेत असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. जे कार्यकर्ते व्यक्त होतायेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद केले जातायेत. ही पद्धत चुकीची आहे. आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हे मुलभूत अधिकार असताना ते शाबीत राहिले पाहिजेत त्यासाठी या बेड्या घालून निषेध केला जात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अमेरिकेत भारतीयांवर जो अन्याय होतोय, व्हिसाबाबत ट्रम्प सरकारने आखलेले धोरण अनेक भारतीयांचं घर संसार उद्ध्वस्त करणारे आहे. ज्या पद्धतीने भारतीयांना विमानात कोंबून भारतात पाठवले. पायात साखळदंड, हातात बेड्या, शौचालयास जायला दिलं नाही. उपाशी पोटी आणले गेले हे सर्व भारतीयांना हिणवणारं आहे. भारतीयांना अपमानित करणारा होता. यात एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते. या पेचात अनेक जण अडकलेत. पोरं अमेरिकेत राहतील, आई बाप महाराष्ट्रात येतील. आई बाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा धोरणामुळे मराठी माणसांची स्वप्ने उद्ध्वस्त होताना दिसतायेत असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान, अमेरिकेतल्या या बेड्यांबाबत आपण भारतीय बोलणार नसू, अमेरिकेत होत असलेल्या अन्यायाबाबत व्यक्त होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. त्यामुळे प्रतिकात्मक स्वरुपात लोकांना लक्षात आणून देण्यासाठी तुमचे भारतीय बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायेत ते या बेड्यांपेक्षा कमी नाही आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात. अमेरिका विरोधात आवाज उचलायला शिका, अमेरिका आपला बाप नाही अशी आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.