विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:21 IST2026-03-04T13:20:48+5:302026-03-04T13:21:59+5:30
भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शाब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली

विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ३ दिवसांच्या सुट्टीनंतर आज पुन्हा अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र विधान भवनाच्या लॉबीत आज एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात भास्कर जाधव संतापलेल्या अवस्थेत दिसतात तर तुम्ही आमचा बाप काढू नका असं सचिन कल्याणशेट्टी त्यांना उत्तर देताना दिसतात.
भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यातील ही शाब्दिक बाचाबाची विधिमंडळात चर्चेचा विषय ठरली. कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. या व्हिडिओत दिसतंय की, भास्कर जाधव संतापून परवा आम्हाला इथं राज्यपालांचे भाषण मिळाले नाही असं बोलतात, त्यावर सचिन कल्याणशेट्टी बाप कशाला काढता, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का असा प्रश्न विचारतात. त्यावर जाधव आणखी संतापून हो आहे असं म्हणतात. त्यावर कल्याणशेट्टी तुम्ही सीनिअर सदस्य आहात असं विधान करतात. त्यावर जाधवांनी ठीक आहे, तुम्ही एवढ्यावर थांबा, मीदेखील थांबतो असं म्हणत वाद संपवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी तुम्ही बाप काढायला नको होता असं विधान केले. त्यावर भास्कर जाधव पुन्हा आक्रमक झाले. जर तुम्हाला परत तेच बोलायचे असेल तर मी काढणार..मग तुम्हाला काय करायचे असेल ते करा असं जाधव म्हणतात. मग सचिन कल्याणशेट्टीही आम्हीही तुमचा बाप काढू असं बोलतात. तेव्हा जाधव यांनी काढा, तुम्हाला काढायचा असेल तर काढा. आम्ही चुकीचे काही केले नाही. तुमच्याकडून शिकायची काही गरज नाही असं बोलतात. त्यावर मी सत्ताधारी पक्षात आहे असं सचिन कल्याणशेट्टी उल्लेख करतात. तेव्हा भास्कर जाधव पुन्हा संतापतात. असू द्या सत्ताधारी पक्षाचे आणि आणखी २ मंत्री असू द्या...इथं खासगी काम कसे करता? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केल्याचे व्हिडिओत दिसून येते.
नेमकं काय आहे प्रकरण?
विधानसभेत प्रवेश केल्यानंतर सभागृहात जाताना सदस्यांना स्वाक्षरी करायला लागते. त्या सही करण्याच्या जागी आमदारांची गर्दी झाली होती. या गर्दीच्या ठिकाणी भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात वाद झाला. या दोघांमधील वादाचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु दोघांमधील वादाचा व्हिडिओ समोर आला आहे.