अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत केल्या दोन मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:35 IST2026-03-06T14:34:11+5:302026-03-06T14:35:17+5:30
Maharashtra Budget 2026: हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्प दादांच्या स्मृतींना समर्पित करत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत केल्या दोन मोठ्या घोषणा
महाराष्ट्राचा २०२६-२७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राहिलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष आठवण काढली. आजचा हा अर्थसंकल्प मी अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करत आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून अजित पवार यांच्याबाबत दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे भाषण करताना माझे मन जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त मंत्रालयाची धुरा सांभाळलेले अजितदादा पवार यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडला होता. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली होती. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आणि त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला दिशा देत आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांना साजेशे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच अजित पवार यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो, तसेच अजित पवार यांच्या स्मृतींना आजचा हा अर्थसंकल्प समर्पित करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सर्वाधिक वेळा राज्याचं उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणाऱ्या अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमातळाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. राज्याच्या वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असलेल्या अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते, अखेरीस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.