Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे 'घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ', सदाभाऊ खोतांची खोचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:32 IST2022-03-11T18:28:55+5:302022-03-11T18:32:38+5:30
Sadabhau Khota : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ, अशा पद्धतीने हा आजचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे 'घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ', सदाभाऊ खोतांची खोचक प्रतिक्रिया
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ, अशा पद्धतीने हा आजचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाले नाही. 50 हजार रुपये मागच्या शेतकऱ्यांना पैसे देऊ म्हणून घोषणा केली. पण ते कधी मिळणार अजून माहिती नाही. दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे. त्यांना काय देणार या सर्व बाबींवर सरकार काहीही बोलले नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
दुसऱ्या बाजूला वीज माफी दिली पाहिजे होती पण वीज बिलाबाबत सरकार काहीही बोलले नाही. सोन्या वरचा टॅक्स कमी केलं, बिल्डरांच्या खरेदी व्यवहारावरील टॅक्स कमी केले. परंतु डिझेल पेट्रोलचा टॅक्स कमी केला नाही. या राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिले नाही. या राज्यातल्या बारा बलुतेदारांना काही दिले नाही. राज्यातल्या धनगर, माळी, ओबीसीसमाज यालाही काही दिलेलं नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिलासा या राज्यातल्या जनतेला देण्याचे काम या सरकारने केलेले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
याचबरोबर, एसटी कर्मचाऱ्यांचे तोंडाला तर पानेपुसली. सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही गाड्या खरीदी करणार म्हणजे परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे. असा हा दिशाहीन आणि भरकटलेला अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.