SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:20 IST2025-11-01T12:14:27+5:302025-11-01T12:20:54+5:30
Maharashtra Board Exam Time Table 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले.

SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे. लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही परीक्षांची तयारी व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असणार आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा बुधवार, १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल. या परीक्षेचा समारोप बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी होणार आहे.
इयत्ता बारावीच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील आणि ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालतील. या कालावधीत विज्ञान शाखेच्या महत्त्वाच्या प्रायोगिक परीक्षा पूर्ण करण्यात येतील. तसेच, वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा देखील घेण्यात येतील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा २ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतील आणि १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडतील.
शारीरिक शिक्षण, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र आणि कला यांसारख्या विषयांच्या मूल्यांकन परीक्षा शाळा स्तरावरच आयोजित करण्यात येणार आहेत. या विषयांचे अंतर्गत मूल्यांकन शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करायचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मुख्य लेखी परीक्षांपूर्वीच या महत्त्वाच्या गुणांची नोंद पूर्ण होईल. मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी माहिती दिली की, या अंतर्गत परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळwww.mahahsscboard.in वर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून आपली तयारी सुरू करावी. सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षांच्या सूचनांनुसार वेळेचे अचूक नियोजन करावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
राज्य मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक १७ सादर करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अर्ज भरण्याची विनंती करण्यात आली. अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस २० रुपये आकारण्यात येणार आहे. अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांना नोंदणी केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागेल. यासाठी www.mahahsscboard.in या वेबसाइटवर आवश्यक माहिती, सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.