Raj Thackeray vs Nishikant Dube, Marathi Language : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातमराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावर राज ठाकरे आणि मनसे प्रचंड आक्रमक झाली असून त्यांनी मिरा-भाईंदरमध्ये एक विराट मोर्चाही काढला होता. या मोर्चाला मराठी माणसांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मिराभाईंदरमध्ये शाखेचे उद्घाटन केले आणि सभा घेतली. 'तुम्ही महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आम्ही पटकून पटकून मारू' असे आव्हान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना दिले होते. या आव्हानाला राज ठाकरे यांनी आज प्रतिआव्हान दिले. तसेच, माज दाखवत अंगावर येणाऱ्याला ठेचायचाच, असा इशाराही दिला.
निशिकांत दुबे यांना प्रतिआव्हान
"भाजपचा एक दुबे नावाचा खासदार म्हणाला, 'मराठी लोगों को हम यहा पर पटक पटक के मारेंगे' म्हणजे मराठी लोकांना आपटून आपटून मारण्याची भाषा केली जात आहे. त्याच्यावर केस झाली नाही. हिंदी चॅनेल्सवाल्यांनी न्यूजही चालवल्या नाहीत. कशा पद्धतीने गोष्टी चालतात ते पाहा. माझं त्या दुबेला सांगणं आहे, दुबे... तू मुंबईत येऊन दाखव, तुला मुंबईतल्या समुद्रात 'डुबे डुबे' के मारेंगे," अशा शब्दांत राज यांनी निशिकांत दुबे यांनी प्रतिआव्हान दिले.
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचा...
"या सगळ्यांना हिम्मत होते कशी, हा प्रश्न आहे. आपले मराठी लोक काही बोलले तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. पण हे लोक जेव्हा बोलतात, त्यावेळी त्यांना माहिती असते की सरकार आमच्या पाठीशी आहे. कारण सरकारच जर या गोष्टी इथे लादत असेल, तर या लोकांची हिम्मत वाढतच जाणार. पण मी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो, तुमची सत्ता लोकसभेत किंवा विधानभवनात असेल पण आमची सत्ता रस्त्यावर आहे. तुम्हीही ५६ इंचांची छाती बाहेर काढून फिरा. कारण हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचा आहे. परत जर कोणी महाराष्ट्रात वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्रसैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती केल्याशिवाय राहणार नाही," असेही राज ठाकरे म्हणाले.
निशिकांत दुबे काय म्हणाले होते?
"तुम्ही हिंदी भाषकांना मारता. तुमच्यात जर हिम्मत असेल तर, तुम्ही उर्दू भाषकांना मारा, तमिलियन्सना मारा. तुम्ही ज्या प्रकारची वाईट कृत्य करत आहात, ते योग्य नाही. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रात बॉस असाल, पण बिहार किंवा उत्तर प्रदेशात येऊन दाखवा, तामिळनाडूत जाऊन दाखवा, तिथे लोक तुम्हाला आपटून आपटून मारतील," असे निशिकांत दुबे म्हणाले होते.