'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:21 IST2021-10-10T17:21:04+5:302021-10-10T17:21:11+5:30
उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी अशोक चव्हाणांकडून आवाहन

'शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याऐवजी त्यांना गाडी खाली चिरडलं जातं', अशोक चव्हाणांचे टीकास्त्र
नांदेड: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसेचा(Lakhimpur Kheri ) देशभरातून विरोध करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारने उद्या म्हणजेच 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याबाबत काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केलं आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणतात की, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अनेक महिन्यांपासून देशातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते.'
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. pic.twitter.com/mutRH5Vyt7
— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 10, 2021
'या घटनेतील पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरीला जाणारे खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना बळाचा वापर करून रोखलं जातं. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नागरिकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावं', असं अशोक चव्हाण म्हणाले.