’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:34 IST2025-12-12T13:34:20+5:302025-12-12T13:34:55+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.

’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
नागपूर – नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन नाकारला जात आहे. सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला.
विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते यांनी शेतकऱ्यांचा नाकारला गेलेला सोयाबीन थेट विधानसभेत आणला. अध्यक्ष आणि मंत्र्यासमोर वडेट्टीवार यांनी पीडित शेतकऱ्यांची व्यथा मांडली. चांगल्या दर्जाचा सोयाबीन देखील जर सोयाबीन खरेदी केंद्रावर नाकारला जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे ? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सरकार गांभीर्याने घेत नाही. विदर्भात अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत नांदेड जिल्ह्यातील गजानन टनमने, संजय सिदखेडे, भगवती किनदट, उल्हास किनदट, गजानन किनदट या शेतकऱ्यांची व्यस्था विधानसभेत मांडली. याची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली. खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पैसे घेतले जातात या आरोपाची चौकशी करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले. चौकशी करून उपाययोजना करावी, असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.