"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 21:26 IST2025-07-04T20:53:27+5:302025-07-04T21:26:37+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी नको, अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; अधिवेशनात मागणी

"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : "राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आज बळीराजाची आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे, असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले, त्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतील, तर हे राज्याला भूषणावह नाही. ही सर्व परिस्थिती बिघडवण्याचे काम सरकारने केले आहे," असा हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला.
विधानसभेत बोलताना ते म्हणाले, "गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खरीप हंगामाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. DBT च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, असा गवगवा करण्यात आला. शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य समर्थन मूल्याने खरेदी केले गेले पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने योजना आणली; आणि ते धान्य घेतल्यानंतर ते पैसे देणे भाग आहे. पण एक वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्याने शेती कशी करावी, हा प्रश्न आहे. लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी स्वतःला औताला जुंपून घेतो आणि शेतकरी भगिनी त्याला हाकते आहे, असे चित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. लातूर जिल्ह्यातील ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणीय नाही. राज्यातील शेतकऱ्याने स्वतःला जुंपून घ्यावे, आणि मग नंतर सरकारने त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, त्याला बैलजोडी देऊन मदत करावी, त्यासाठी वाट बघावी का?"
"सरकारने गोरक्षणाचा कायदा केला. गोंदिया जिल्ह्यात शेतकरी उन्हाळ्यात शेतीसाठी बैल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांचे बैल जप्त केले आणि तथाकथित गोरक्षकांच्या स्वाधीन करून त्यांच्या संस्थेत पाठवले. मी कलेक्टरला फोन केला असता, त्यांनी ठाणेदाराला सांगून सोडविण्यासाठी सांगितले; परंतु या तथाकथित गोरक्षकांनी ते बैल देण्यास नकार दिला. त्यांनी ते परस्पर विकून टाकले. हे तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांना लुटत आहेत. यावर सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. काल घडलेली घटना राज्याला भूषणावह नाही. शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने लावली आहे," असा आरोपही पटोले यांनी केला.