maharashtra assembly election 2019 Exit polls were falsified earlier | Maharashtra Election 2019; विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे
Maharashtra Election 2019; विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

-मोसीन शेख 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा वेळ संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं बाहेर येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होतील. माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोल याचा उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.

विधानसभा निवडणुकीचे सोमवारी मतदान संपताच, माध्यमांमध्ये एक्झिट पोलचा धडका सुरु झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आलेल्या सर्व पोलनुसार महायुती पुन्हा सरकार बनवेल असे दाखवले जात आहे. तर महाआघाडीला पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ ला एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते.

२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएला २२५ जागांवर तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.

२००४ प्रमाणेच २००९ मधील परिस्थिती एक्झिट पोलची पहायला मिळाली होती. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. एक्झिट पोलच्या अंदाज यावेळी खोटा ठरला होता, तर यूपीएच्या जागा प्रचंड वाढताना पहायला मिळाल्या होत्या.

२०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर, काँग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर काँग्रेसला ६८ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळीही एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ विधानसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २४ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

 


Web Title: maharashtra assembly election 2019 Exit polls were falsified earlier
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.