‘हाफकिनमधील मौल्यवान त्रिगुणी लसीसाठी वापरण्यात येणारी स्टेन खासगी कंपनीला विकण्याचा घाट’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:49 IST2026-03-24T13:43:56+5:302026-03-24T13:49:07+5:30
Maharashtra Assembly Budget Session 2026: हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. जर खासगी कंपनीच्या हातात गोष्टी गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

‘हाफकिनमधील मौल्यवान त्रिगुणी लसीसाठी वापरण्यात येणारी स्टेन खासगी कंपनीला विकण्याचा घाट’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबई – हाफकिनकडे असलेला डीपीटी लस तयार करण्याचा स्टेन ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव-संपत्ती आहे. याचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही विचारणा न करता हाफकिनने लगेच एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आक्षेप घेतला.
हाफकिन ही संस्था स्वतः लस उत्पादनात सक्षम असताना, १५०० कोटींचा हा मौल्यवान ठेवा खाजगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे, असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. जर खासगी कंपनीच्या हातात गोष्टी गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल.राज्याच्या मौल्यवान जैव-संपत्तीवर खाजगी कंपनीचे नियंत्रण हा धोका आहे अस वडेट्टीवार विधानसभेत म्हणाले.
त्यामुळे खाजगी कंपनीला स्टेन देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी. हाफकिनला स्वतःचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि प्राधान्य द्यावे ,अशी भूमिका वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली.