तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 19:32 IST2025-03-19T19:31:39+5:302025-03-19T19:32:37+5:30
LMOTY 2025: जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील तुमचे लाडके तीन मंत्री कोण, असा प्रश्न विचारला होता.

तुमचे सर्वांत लाडके ३ मंत्री कोणते?; जयंत पाटलांचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी योजनाच जाहीर करून टाकली!
CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा म्हणून 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्याकडे पाहिलं जातं. हा पुरस्कार सोहळा आज मुंबईतील राजभवन इथं पार पडत असून या सोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत रंगली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटलांच्या विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर देत जोरदार फटकेबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी मंत्रिमंडळातील तुमचे लाडके मंत्री कोण, असाही प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मी आता लाडका मंत्री योजना जाहीर केल्याचं मिश्किलपणे सांगतले.
नागपूरमध्ये निर्माण झालेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना बोलावून तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नयेत, याबाबत तंबी दिल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री असल्याचं सांगत त्यांनी मला कसलीही तंबी न दिल्याचा खुलासा नितेश राणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
मु्ख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
तुमच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री काल म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांचा सर्वांत लाडका मंत्री आहे. मंत्रिमंडळातील तुमचे सर्वांत लाडके तीन मंत्री कोणते आहेत? असा प्रश्न जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, "मी आता मुख्यमंत्री लाडका मंत्री योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या निकषात जे बसतील ते लाडके मंत्री ठरतील."
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मिश्किल उत्तरावर जयंत पाटील यांनीही टिपण्णी करत "आता या योजनेत सामील होण्यासाठी मंत्र्यांची स्पर्धा लागेल" असं म्हटलं.