गुन्हेगारीच्या उंबरठ्यावरुन शिक्षणाच्या वाटेवर; मतीन भोसलेंच्या 'प्रश्नचिन्ह'ने घडवली किमया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:48 IST2026-03-11T15:47:40+5:302026-03-11T15:48:43+5:30
Matin Bhosle : गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुरू केलं.

गुन्हेगारीच्या उंबरठ्यावरुन शिक्षणाच्या वाटेवर; मतीन भोसलेंच्या 'प्रश्नचिन्ह'ने घडवली किमया
अथांग समुद्राच्या लाटांची गाज आणि अपार उत्साहात गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अभिनेते आमिर खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखत हे या रंगतदार सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलं. विविध क्षेत्रात अलौकीक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आलं.
लोकसेवा-समाजसेवा या कॅटेगरीमध्ये अमरावतीच्या मतीन भोसले यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते मतीन भोसले यांना पुरस्कार देण्यात आला. मतीन यांनी ‘प्रश्नचिन्ह’नावाची आश्रमशाळा काढली. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी सुरू केलं.
आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली. मतीन भोसले यांना वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शेतातली फळं खाल्ली म्हणून एका शेतकऱ्याने तीन तास दोरीने बांधून ठेवलं होतं. पुढे एकदा दुष्काळ पडला असताना शिकार मिळत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी दुसऱ्यांच्या शेतातली सहा ज्वारीची कणसं तोडली. तेव्हा वडिलांना ‘चोर’ ठरवून सहा क्विंटल ज्वारी चोरली या आरोपाखाली शिक्षा झाली. हे असलं सगळं अनुभवतच ते लहानाचे मोठे झाले.
शिक्षणामुळे बदललं आयुष्य
स्वतः फासेपारधी समाजातील असल्यामुळे लहानपणापासून फक्त अन्यायच त्यांच्या वाट्याला आला. पण नशीब त्यांच्या वाट्याला शिक्षणही आलं. मतीन भोसले शिकले. स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाले. पण फासेपारधी मुलांच्या वाट्याला येत असलेल्या दुर्दशेचा डंख मनातून गेला नव्हता. राज्यभरातूनच नव्हे झारखंड, चेन्नईसह इतर ठिकाणची रेल्वे स्टेशन, बसस्टँड, सिग्नलवर भीक मागणाऱ्या फासेपारधी समाजाच्या चार हजारांहून अधिक मुलांच्या हाती त्यांनी पाटी-पेन्सिल आणि पुस्तक दिलं आहे. यासाठी त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’ नावाची आश्रमशाळा काढली.
‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळा
२०११ पासून पदरमोड करुन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे ही आश्रमशाळा ते चालवतात. या शाळेत १ ते १० वीपर्यंतचे वर्ग भरतात. आतापर्यंत चार हजारांवर विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतलं आहे. ‘प्रश्नचिन्ह’ ही आश्रमशाळा त्यांच्या आयुष्यात आली नसती, तर यातली बहुतांश मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती... आणि आता? त्यांपैकी अनेक मुलं नोकरी, उद्योगाला लागली आहेत, तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. मतीन भोसले यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचाच लोकमतच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, तसेच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, केदार शिंदे, बॉलिवूड पार्श्वगायक शान, लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक तथा संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांच्यासह प्रशासन, उद्योग, शिक्षण, समाजकारण, चित्रपट, कला-क्रीडा आणि वैद्यकीय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अविस्मरणीय झाला.