मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक समजले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गेल्या काही दिवसांपूर्वी वेगळ्याच मिशनवर असल्याचं दिसतं आहे. सध्या भाजपामध्ये इनकमिंग जोरात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. मात्र यातील बऱ्याच पक्षप्रवेशांमागे एक समानता आहे. या सर्व नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या सर्व नेत्यांनी भाजपाची वाट धरली.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपावासी झाले. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील, राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना महाजन यांची भेट घेतली होती. दोन्ही काँग्रेसमधील नेते पक्ष प्रवेश करण्याच्या आधी तुमचीच भेट का घेतात, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी सगळे तुमच्याशी चर्चा का करतात, असे प्रश्न महाजनांना लोकमतच्या फेसबुक लाईव्हमध्ये विचारण्यात आले. त्यावर महाजन यांनी गमतीशीर उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना माझा बंगला लागतो. माझा बंगला आधी येत असल्यानं ही नेतेमंडळी आधी माझ्याकडे येत असावीत, असं महाजन मिश्किलपणे म्हणाले.
Exclusive: काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपात येण्याआधी महाजनांनाच का भेटतात? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 15:23 IST