राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:07 IST2025-12-03T14:06:40+5:302025-12-03T14:07:29+5:30
Local Body Election Counting postpone Story: अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची.

राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबरला पार पडले. अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. यावरून राज्यात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती. यामागे नेमके काय घडले, कोणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराने हा निकाल पुढे ढकलण्यास लावला याची माहिती समोर आली आहे.
वर्ध्यात नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले भाजपचे वर्ध्यातील प्रभाग क्रमांक 9 ब चे उमेदवार प्रदिपसिंग ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांच्या नामांकन अर्जावर आक्षेप घेतल्यावर हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात गेले होते. त्यानंतर ते उच्च न्यायालयात देखील गेले होते.
निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रभागाची निवडणूक आदल्याच दिवशी रद्द करत असल्याची नोटीस पाठविली होती. तसेच ही निवडणूक पुढे ढकलली होती. परंतू, महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकीचा मतमोजनीचा दिनांक मात्र तीन डिसेंबर हा कायम ठेवण्यात आला होता. हा निकाल आपल्या प्रभागासाठी होणाऱ्या 20 डिसेंबरच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणार असा आक्षेप ठाकूर यांनी घेत नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे धाव घेतली होती.
याचिका दाखल करीत निवडणूक निकाल हा पुढील निवडणुकीवर आणि मतदारावर प्रभाव टाकाणारा ठरेल असा युक्तिवाद प्रदिपसिंग ठाकूर यांच्याकडून करण्यात आला. त्यावर न्यायालयाने मतमोजणीच पुढे ढकलण्याचा निकाल दिला. यामुळे ही मतमोजणी आता आज म्हणजेच ३ डिसेंबरऐवजी ठाकूर यांच्या प्रभागातील निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २१ डिसेंबरला केली जाणार आहे.