‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 19:30 IST2025-12-23T19:29:20+5:302025-12-23T19:30:08+5:30

Local Body Election: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने थेट ३८ नगराध्यक्ष आणि राज्यात पक्षामार्फत लढल्या गेलेल्या ३ हजार ६८१ जागांपैकी जवळपास ११०० नगरसेवक पक्षाच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत निवडून आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Local Body Election: '38 mayors, 1100 corporators elected on clock symbol; good strike rate in rural areas', Sunil Tatkare gave information | ‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती

‘३८ नगराध्यक्ष, ११०० नगरसेवक घड्याळ चिन्हावर निवडून आणले; ग्रामीण भागात चांगला स्ट्राईक रेट’, सुनिल तटकरेंनी दिली माहिती

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने थेट ३८ नगराध्यक्ष आणि राज्यात पक्षामार्फत लढल्या गेलेल्या ३ हजार ६८१ जागांपैकी जवळपास ११०० नगरसेवक पक्षाच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत निवडून आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व महायुतीतील भाजप - शिवसेना या मित्र पक्षांना राज्यातील जनतेने प्रचंड पाठबळ व चांगला प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) निवडणूक लढली तर काही ठिकाणी भाजप - राष्ट्रवादी युती आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार)- शिवसेना अशी युती झाल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या निवडणूकांना सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)ने थेट ३८ नगराध्यक्ष आणि तर राज्यात एकंदरीत पक्षामार्फत लढल्या गेल्या ३ हजार ६८१ जागांवर नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर १ हजार ९० म्हणजे जवळपास ११०० नगरसेवक अधिकृत घड्याळ चिन्हावर निवडून आले असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

काही ठिकाणी स्थानिक आघाडी, काही ठिकाणी विकास आघाडी अशाही आमच्या आघाड्या झाल्या होत्या आणि यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत ते पक्षाच्या अधिकृत आकडेवारीमध्ये धरलेले नसले तरी राज्यात झालेल्या या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळालाच शिवाय ग्रामीण भागात स्ट्राईक रेट चांगला राहिला हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व मंत्री मंडळातील आमचे सहकारी, पक्षाने नेमलेल्या स्टार प्रचारकांनीही प्रचाराची धुरा चांगल्या पध्दतीने हाताळली. आम्हाला सर्व ठिकाणी यश आलेच असे नाही परंतु हे घडत असताना ९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणूकांचे जनतेत औत्सुक्य होते शिवाय निवडणूका न झाल्याने जनतेमध्ये नाराजीसुध्दा होती. पण निवडणूका होत आहेत याची स्वीकृतीही होती असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

पक्षाने सामुदायिक मेहनत करत टीमवर्क म्हणून आपले काम दाखवले ते वाखाणण्याजोगे होते. आता महानगरपालिकेच्या निवडणूकीचे नियोजन सुरू आहेच शिवाय येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही अशाच पध्दतीचे नियोजन करणार आहोत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.

Web Title: Local Body Election: '38 mayors, 1100 corporators elected on clock symbol; good strike rate in rural areas', Sunil Tatkare gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.