परत सांगतो सोडून जाईन! सोडू-सोडू म्हणत भाजपल्या बिलगलेल्या 'उद्धवदादू'ला 'राजा'चा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 19:59 IST2018-01-24T19:50:00+5:302018-01-24T19:59:25+5:30
२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे.

परत सांगतो सोडून जाईन! सोडू-सोडू म्हणत भाजपल्या बिलगलेल्या 'उद्धवदादू'ला 'राजा'चा चिमटा
मुंबई - २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामधून शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे.
युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. त्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे. " महाराष्ट्र सरकार (मधील एक) सादर करत आहे. (किती अंकी महित नाही. "परत सांगतो सोडून जाईन!" अशा आशयाचे शीर्षक राज यांनी या व्यंगचित्राला दिले आहे.
त्याआधी काल राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून गुजरात निवडणुकीत झालेल्या दमछाकीवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चिमटा काढला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्रातून अत्यंत मार्मिक भाष्य राज यांनी या व्यंगचित्रामधून केले होते.
गुजरातमध्ये पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा उंचावली हे वास्तव आहे. भाजपाने सरकार स्थापन केले यापेक्षा काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी सुधारली. राहुल गांधींनी आपले राजकीय चातुर्य दाखवून दिले. राज यांनी तोच धागा पकडत गुजरातमध्ये मोदी-शहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचे आपले व्यंगचित्रातून दाखवून दिले. या निवडणुकीने राहुल यांची सोशल मीडियावरील पप्पू ही प्रतिमा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली.
एरवी राज ठाकरे आपल्या भाषणांमधून राहुल गांधींची खिल्ली उडवतात पण यावेळी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी राहुल यांचे कौतुक केले. गुजरात निवडणुकीने मोदी-शहांना छोटे केले तर राहुल यांची राजकीय उंची वाढवल्याचा निष्कर्ष राज यांनी काढला आहे.