कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 08:38 IST2025-07-28T08:38:07+5:302025-07-28T08:38:41+5:30
आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
रत्नागिरी - भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या इच्छेपलीकडे काहीच नाही. महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल परंतु कार्यकर्त्यांच्या मताचा आदर ठेवला पाहिजे. आपण स्वबळावर लढलं पाहिजे हा कार्यकर्त्यांचा दबाव आहे. आपली ताकद किती हे दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे असं सांगत भाजपा मंत्री नितेश राणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, आज रत्नागिरीत आमच्याकडे विधानसभा, जिल्हा परिषद कुणीही प्रतिनिधी नाहीत. सिंधुदुर्गात सावंतवाडी जिल्हाप्रमुखांनी शिवसेना ६० टक्के आहे असं सांगितले तर आम्हालाही भाजपाची ताकद दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. कोण कुठे उभा आहे जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने आमच्याकडे येत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहे. रत्नागिरी असो वा सिंधुदुर्ग स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंना सिंधुदुर्गात ९० टक्के मते मिळाली परंतु रत्नागिरी मते ट्रान्सफर होताना दिसले नाही. शिंदेसेनेकडून भाजपाला मते मिळाली नाहीत. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात आम्ही पिछेहाट होतो. त्यामुळे कधी तरी दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. टोकाची भाषणे करायची नाहीत परंतु मैत्रीपूर्ण लढत करू. स्वबळाची भावना आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत. महायुतीत मित्रपक्षांनी एकमेकांना मानसन्मान ठेवला पाहिजे. आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का?. ही टिकवण्याची गरज आहे का? जर उबाठा आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांना टार्गेट केले पाहिजे. आमच्याकडे शिंदेसेनेचे कार्यकर्ते येत नाहीत का? मी यादी दिली तर मोठी आहे त्यांना भाजपात यायचे आहे. महायुतीचे वातावरण खराब करायचे नाही. परंतु धमकावून वातावरण खराब करायचे असेल तर त्यांनी विचार करून पाऊले उचलावीत. याच प्रकारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला युती करायची नाही. हीच भावना कार्यकर्त्यांची असल्याने ते आमच्यावर दबाव वाढवत आहेत असंही नितेश राणे यांनी म्हटलं.
दरम्यान, तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल तर उबाठा फोडा. त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या पक्षात नारायण राणे आहेत त्या पक्षातील लोक फोडून तुम्ही राणे साहेबांचे निष्ठावंत कसे होणार? याचा विचार करायला हवा. ते एवढ्या ताकदीचे आहेत मग आम्ही इथे बसून गोट्या खेळतोय का? आम्हाला कशाला बरोबर घेता? नारायण राणे, रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात आहेत त्यांना कमी लेखायचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एवढे मातब्बर असतील तर खरेच त्यांनी एकटे लढवले पाहिजे अशा शब्दात नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.