‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:13 IST2025-07-19T06:12:28+5:302025-07-19T06:13:06+5:30
Awhad-padalkar Clash Row: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मारहाण प्रकरणावरून २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला.

‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
मुंबई : विधानभवन लॉबीमध्ये झालेल्या मारहाणीचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. विधानभवनात प्रवेशासाठीचे पासेस ५ ते १० हजारांना विकले जात असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे व आ. अनिल परब यांनी केला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मारहाण प्रकरणावरून २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेली मारहाणीची घटना लाजिरवाणी आहे. परंतु पोलिस एकांगी कारवाई करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सभापतींनी गेट पास बंद करण्याचे निर्देश देऊनही पास देण्यात आले. विधानभवनाच्या परिसरात इतकी गर्दी कशी? गुन्हेगारी वृत्तीचे लोक कसे आले? याची चौकशी करण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी केली, तर विधान भवनाजवळील आयनॉक्स येथे ५ ते १० हजारांत पास विकले जात आहेत, असा आरोप आ. अनिल परब यांनी केला.
भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी त्यास आक्षेप घेत विरोधकांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मंत्री शंभूराज देसाई यांनी अध्यक्ष आणि सभापतींच्या नियंत्रणाने पासचे वाटप केले जाते. त्यामुळे आक्षेप न घेता पुरावा द्यावा. त्यावर कारवाई करू, असे सांगितले. संसदीय कार्यमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असून, विधिमंडळाचा स्तर राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.