सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 05:39 AM2019-11-12T05:39:38+5:302019-11-12T05:40:33+5:30

राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत

Leadership will be supported only after the rule of power is decided! | सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

Next

मुंबई : राज्यातील सत्तापेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंगळवारी मुंबईत दाखल होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहेत. शिवसेना आणि आघाडीत सत्ता वाटपाचे सुत्र ठरल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्यावर निर्णय होणार असल्याचे समजते.
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीकडे लागले होते. मात्र सांयकाळपर्यंत काँग्रेसचा निर्णयच होऊ शकला नाही; त्यामुळे राष्टÑवादीने आपल्या पाठिंब्याचे पत्र शिवसेनेला दिलेच नाही.
सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला ७२ तासांचा वेळ दिला होता. मात्र शिवसेनेला फक्त फक्त २४ तासांचा अवधी दिला. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याने त्यांनी वेळ वाढवून मागितला; पण राज्यपालांनी तो दिला नाही, अशी तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे अशी शरद पवार यांची इच्छा आहे. राष्टÑवादीचे १२, काँग्रेसने १२, आणि शिवसेनेने १८ मंत्रीपदे घ्यावीत असा प्रस्ताव शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरला होता. तो प्रस्ताव दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांनाही सांगितला गेला. मात्र सत्तेत सहभागी व्हायचे की फक्त बाहेरुन पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेसचा निर्णय होत नव्हता. बाहेरुन पाठिंबा द्यावा आणि फक्त अध्यक्षपद काँग्रेसने घ्यावे असा मुद्दा पुढे आणला गेला. मात्र त्याला राष्टÑवादी तयार होत नव्हती. दरम्यान, काँग्रेसचे आमदार सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे सत्तेत सहभागी व्हायचे असेल तर काँग्रेसच्या वाट्याला काय मिळेल याची आधी चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले.
काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील गटनेते के. सी. वेणुगोपाल, वरिष्ठ नेते अहमद पटेल हे उद्या मुंबईत येत असून ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत सत्तावाटपाचे सुत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचे समजते.
>पाठिंब्याची पत्रे का थांबली?
काँग्रेस नेत्यांचे दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. सकाळी महाराष्टÑातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस आमदारांशीही चर्चा केली.
बहुसंख्य आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सहमत दर्शविली मात्र पाठिंब्यासाठीच्या अटी आणि शर्थी कोणत्या असाव्यात याचा निर्णय होऊ शकला नाही.
शिवाय, काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी व्हायचे की, बाहेरून पाठिंबा द्यायचा, यावरही एकमत होऊ शकले नाही. शरद पवारांशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर पाठिंब्याचे पत्र द्यायचे की नाही, यावर निर्णय होणार आहे.
>आता पुढे काय?

१) संख्याबळानुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपने सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले, तर शिवसेनेला निर्धारित वेळेत संख्याबळाचे गणित जुळविता आले नाही. त्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. तशी विचारणा राज्यपालांनी त्यांच्याकडे केली आहे.
२) राष्टÑवादीकडे सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नाही. त्यामुळे एकतर त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळवावा लागेल. पण या परिस्थितीत राष्टÑवादीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करावे लागेल. मात्र त्यास शिवसेना तयार होईल का?
३) सरकार स्थापन करण्यासंदर्भातील सर्व शक्यता आजमावल्यानंतर राज्यपाल राज्यात राष्टÑपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात.
४) राष्टÑपती राजवट लागू झाल्यानंतरहीे सत्ता स्थापनेचा दावा करता येऊ शकतो. असा दावा शिवसेना पुन्हा करणार असेल तर त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्टÑवादीचा पाठिंबा मिळवावा लागेल.
५) शिवसेनेला पांिठंबा देण्याबाबत काँग्रेसने नकार दिला तर राष्टÑपती राजवट कायम राहिल.
६) राजकारणात काहीही घडू शकते, या अनुभवानुसार उद्या कदाचित भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात किंवा राष्टÑवादी काँग्रेस भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकते. मात्र ही शक्यता फारच धूसर आहे.

Web Title: Leadership will be supported only after the rule of power is decided!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.