Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:47 IST2025-09-27T12:46:59+5:302025-09-27T12:47:42+5:30
Laxman Hake's Car Stone Pelting: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अज्ञात तरुणांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली.

लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला. प्रातिनिधिक फोटो.
Laxman Hake Car Attack: ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. लक्ष्मण हाके हे अहिल्यानगर जिल्ह्यात एका ठिकाणी सभेसाठी निघाले होते. ज्या कारमधून हाके जात होते, त्याच कारवर दगडफेक करत लाठ्यांनी हल्ला करण्यात आला.
अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यातून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही.
सभेला जात असताना कारवर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांची अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी लक्ष्मण हाके हे सहकाऱ्यांसह अहिल्यानगरकडे निघाले होते. त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही होता.
अहिल्यानगर तालुक्यातील आरणगाव रोडवरील एका हॉटेल समोर त्याची कार येताच दगडफेक करण्यात आली. अज्ञात तरुणांनी दगडफेक आणि लाठ्यांनी केलेल्या हल्ल्यात कारचे नुकसान झाले. पण, सुदैवाने लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी हल्ल्यातून बचावले.
हल्ला झाल्यानंतर लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासोबत असलेल्या वाहनांचा ताफा थांबला. त्यावेळी हल्लेखोर तरुण फरार झाले. हाके यांच्या सहकाऱ्यांकडून याबद्दलची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.
बीडमध्ये हाकेंच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
काही दिवसांपूर्वी म्हणजे २२ सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाके यांचे जवळचे सहकारी पवन कंवर आणि त्याच्या सहकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील सावरगाव जवळ एका ढाब्यावर पवन कंवर हे त्यांच्या मित्रांसोबत जेवणासाठी थांबले होते. त्याचवेळी ३०-४० जणांनी त्यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला. यात ते जखमी झाले होते.
नवनाथ वाघमारेंचीही कार जाळली
हाके यांचे आणखी एक सहकारी असलेल्या नवनाथ वाघमारे यांची कार जाळण्यात आल्याची घटनाही काहीच दिवसांपूर्वी घडली. जालना शहरात घरासमोर कार उभी केलेली होती. ती पेट्रोल टाकून जाळण्यात आली.
लक्ष्मण हाकेंवर दुसऱ्यांदा हल्ला
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.