Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
By राजकुमार जोंधळे | Updated: July 21, 2025 00:16 IST2025-07-21T00:16:14+5:302025-07-21T00:16:49+5:30
Latur News: ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.

Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
- राजकुमार जाेंधळे
लातूर - ‘छावा’चे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे-पाटील यांना झालेल्या मारहाणीचे लातूर शहरात रात्री उशिरापर्यंत तीव्र पडसाद उमटत हाेते. ‘छावा’चे कार्यकर्ते रविवारी रात्री रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत हाेते. काहींनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य मार्गावर लावलेले बॅनर फाडले.
राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपली भूमिका मांडताना ॲड. घाडगे-पाटील यांनी पत्ते उधळत मागण्या मांडल्या आणि निवेदन दिले. त्यानंतर ते विश्रामगृहात थांबलेले असताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ‘छावा’चे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी राष्ट्रवादीच्या काहीजणांनी ॲड. घाडगे पाटील व तेथील एकदाेघांना मारहाण केली. पाेलिस येईपर्यंत बराच गदाराेळ सुरू हाेता. स्थानिकचे कार्यकर्ते हस्तक्षेप करून भांडणे नकाे, असे आवाहन करीत हाेते. परंतु, जबर मारहाणीमुळे वातावरण तापले. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा औसा राेडवर ‘छावा’च्या काही संतप्त कार्यकर्त्यांनी बॅनर फाडत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीविराेधात जाेरदार घाेषणाबाजी सुरू केली. त्यावेळी तत्परतेने पाेलिस दाखल झाले. त्यांनी शांततेचे आवाहन केले. काही वेळानंतर जमाव पांगला. पाेलिसांनी रात्री उशिरापर्यंत बंदाेबस्त वाढविला हाेता.
विविध स्तरांतून निषेध...
मारहाणीच्या घटनेनंतर काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी निषेध नाेंदविला. तसेच साेमवारी हाेणाऱ्या सर्वपक्षीय बंद आंदाेलनामध्ये आम्ही सहभागी आहाेत, असे सांगितले. शेतकऱ्याच्या आंदाेलनाला दडपणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले, हा पक्षीय विषय नाही. शेतकऱ्याच्या मुलावर झालेला भ्याड हल्ला आहे.