दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 07:09 IST2025-08-25T07:08:34+5:302025-08-25T07:09:10+5:30

Nandurbar News: सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे.

Landslides occurred, roads cracked in the middle, bridges also collapsed. | दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

दरडी कोसळल्या, रस्त्यांना मधोमध तडे, पूलही खचले, सातपुड्यात मुसळधार पाऊस, नर्मदा खोऱ्यातील गावांचा संपर्क तुटला

नंदुरबार -  सातपुड्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा खोऱ्यातील गावांचा नंदुरबार जिल्हा आणि अक्कलकुवा तालुका मुख्यालयासोबतचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे दरडी कोसळून रस्ता खंडित होण्यासह नदी-नाल्यांना पूर आल्याने ही स्थिती झाली आहे. शनिवार रात्र ते रविवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरू असल्याने दुर्गम भागात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे.

शनिवारी सायंकाळपासून अक्कलकुवा तालुक्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोलगी मंडळात रविवारी सकाळी ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा काठावरील मणिबेली, चिमलखेडी, वडफळी, मांडवा, पिंपळखुटा, मोलगी, भगदरी या परिसरातील गाव व पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडी कोसळल्या आहेत. 

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले  
नातेपुते (जि. सोलापूर) : नीरा नदीवरील वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून नदीपात्रात १५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू झाला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गंगापूर धरण ९७ टक्के भरले
नाशिक : गंगापूर धरण रविवारी ९७.१० टक्के इतके भरले. ५४६७ दलघफू इतका जलसाठा धरणात आहे.  

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला
कणकवली : कणकवली शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. अधूनमधून तुरळक सरी कोसळत आहेत. तर कडक ऊन पडत असल्याने वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. यामध्ये देवगड तालुका १ मिलिमीटर, मालवण तालुका ११ मिलिमीटर, सावंतवाडी तालुका ३ मिलिमीटर, वेंगुर्ला तालुका २ मिलिमीटर, कणकवली तालुका ८ मिलिमीटर, कुडाळ तालुका ९ मिलिमीटर, वैभववाडी तालुका ३ मिलिमीटर, दोडामार्ग तालुका ५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

पंचगंगेची पातळी साडेतीन फुटांनी कमी 
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून जोरदार सरीही कोसळत होत्या, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी आहे. परिणामी नद्यांची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी साडेतीन फुटांने कमी झाली असून, अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चदंगड या तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी काेसळत आहेत. 

Web Title: Landslides occurred, roads cracked in the middle, bridges also collapsed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.