Shaktipeeth Highway: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:56 IST2026-02-05T13:55:48+5:302026-02-05T13:56:48+5:30
२७ फेब्रुवारीला प्रांत कार्यालयावर मोर्चा

Shaktipeeth Highway: हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली जमीन शक्तीपीठाला देणार नाही, शेती बचाव समितीचा इशारा
ईश्वरपूर : हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली १ इंचही जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही, असा निर्धार करत शेती बचाव व संघर्ष समितीने प्रसंगी शक्तीपीठ महामार्गाला कानाबरोबर काठ्या काढून विरोध करू, असा इशारा केंद्र व राज्य शासनाला दिला. या महामार्गाला विरोध करण्यासाठी २७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी वाळवा तालुक्यातील सर्व शेतकरी, परिवर्तनवादी व पुरोगामी संघटना, समविचारी पक्ष यांनी एकत्र येऊन शक्तीपीठ महामार्गविरोधी शेती बचाव संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीमधील श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर, बळीराजाचे बी.जी. पाटील, विद्रोहीचे धनाजी गुरव, दिग्विजय पाटील, रणजीत चव्हाण, दलित महासंघाचे शंकर महापुरे, संभाजी ब्रिगेडचे अजित हवालदार, धरणग्रस्त संघटनेचे संतोष गोठणकर,दीपक कोठावळे यांनी पत्रकार परिषद घेतली.
वाचा: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातील सोळा गावांतून जाणार, नवीन आराखड्याबाबत गोपनीयता
डॉ. पाटणकर म्हणाले, शासनाने शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे का याची खात्री करावी. महामार्ग निर्मितीत शेतकऱ्यांच्या विकासाचा कोणताही मुद्दा नाही. समृद्धी मार्ग हा अपघाती बळी घेणारा महामार्ग झाला आहे. शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे.
बी.जी. पाटील म्हणाले, देव आणि धर्माचा वापर करून निर्माण होणारा शक्तीपीठ मार्ग शेतकऱ्यांसाठी महासंकट आहे. जमिनी क्षारपड होणार आहेत. तालुक्यातील कृष्णा-वारणा नद्यांना मोठे पूर येण्याची भीती आहे. मागणी नसताना महामार्ग लादला तर तो आम्ही होऊ देणार नाही. गुरव म्हणाले, रस्ते निर्मितीला धार्मिक अधिष्ठान देऊन शेतकऱ्यांना भीती घातली जात आहे. वाळवा तालुक्याला उजाड करणारा हा महामार्ग ठरेल. त्यासाठी सगळे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी.
नाव देवाचे अन् भले कोणाचे
शक्तीपीठ, भक्तीपीठ अशी नावे देत होणारे हे महामार्ग शेतकऱ्यांच्या कसल्याही उपयोगाचे नाहीत. त्यामुळे या देवांच्या नावाने होणाऱ्या महामार्गाच्या आडून उद्योगपतींची गावे वसवून त्यांचेच भले करण्याचा हा डाव आहे.
नैसर्गिक संपर्क तुटणार
वाळवा तालुक्यातून जाणारा हा महामार्ग सहापदरी आहे. त्यामुळे तो शेती किंवा गावे जोडणारा नाही. महामार्गात जाणाऱ्या जमिनीपेक्षा दोन्ही बाजूला पाणी साचून नापीक होणारी जमीन जास्त असेल. या मार्गामुळे गावे, शेती, वस्त्यांचा नैसर्गिक संपर्क तुटणार आहे.
वाळवा तालुक्यातील गावे..!
पलूस तालुक्यातून येणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची वाळवा तालुक्यातील मसूचीवाडी येथून सुरुवात होईल.त्यानंतर जुनेखेड,नवेखेड, बोरगाव,उरुण-ईश्वरपूर, वाळवा, येडेनिपाणी, कामेरी, येलूर, इटकरे, कुरळप, ऐतवडेबुद्रुक अशा गावातील जमिनी घेत पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील पारगावकडे जाणार आहे.