Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:26 IST2025-03-05T15:25:34+5:302025-03-05T15:26:04+5:30
Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये...
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारीसोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) March 4, 2025
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे.
७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा… pic.twitter.com/37HlfDfPWF
मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन आदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे.
लाडक्या बहिणींची संख्या घटली
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना 1500 रुपये मिळाले होते. तर, जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखांनी घटून 2 कोटी 41 लाख इतकी झाली होती. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर यामध्ये साधारणपणे 9 लाखांची घट झाल्याची माहिती आहे.